पिंपरी -वाहनांची वायुप्रदूषण तपासणी करून वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पोल्युशन टेस्ट सर्टिफिकेट – पीयूसी) मिळणे आता महाग झाले आहे. पीयूसी चाचणीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून दुचाकीच्या पीयूसी चाचणीच्या दरात 15 रुपये आणि चारचाकी वाहनाच्या दरात 35 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तत्काळ लागू झाली आहे.
वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या धुरांमधून विषारी वायू बाहेर पडत असतात. त्यामुळे वायुप्रदूषणात भर पडते. वायूच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी (पोल्युशन टेस्ट सर्टिफिकेट म्हणजेच पीयूसी) करणे बंधनकारक केले आहे.
नवीन वाहन खरेदी केल्यानंतर पीयूसीची मुदत एक वर्षांपर्यंत असते. त्यानंतर दर सहा महिन्यांनी हे प्रमाणपत्र काढणे बंधनकारक असते. आता या चाचणीच्या दरवाढीचा बोजा वाहनचालकांवर पडला आहे.