पिंपरी – राज्य शासनाच्या गृहविभागाने जारी केलेल्या दोषसिद्धीच्या प्रमाणासंदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय राज्यामध्ये सहाव्या स्थानी आहे. शहरात दोषसिद्धीचे प्रमाण हे 43.22 टक्क्यापर्यंत पोचले आहे. तर पुणे शहर हे सातव्या स्थानी असून दोषसिद्धीचे प्रमाण 41.72 इतके आहे. पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवड तुलनेत आघाडीवर असले तरी इतर शहरांच्या तुलनेत मात्र पिछाडीवर असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
गृहविभागाने सन 2021 या वर्षाची तुलनात्मक माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्वोच्च स्थानावर मिरा भाईंदर 89.63 टक्के, नवी मुंबई 54.74 टक्के, ठाणे शहर 54.08 टक्के, मुंबई शहर 52.04 टक्के, नागपूर शहर 51.63 टक्के, पिंपरी चिंचवड 43.22, पुणे शहर 41.72, सोलापूर शहर 32.91, औरंगाबाद शहर 32.08 तर नाशिक पोलीस आयुक्तालयात टक्केवारीत सर्वात शेवटच्या म्हणजे 11 व्या स्थानी आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे दोषसिद्धीचे प्रमाण 55.36 टक्के इतके आहे.
विषेश म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालय हे दोन्ही एकाच वेळी सुरू झाली आहेत. तरी देखील मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालय हे दोषसिद्धीच्या बाबतील पहिल्या क्रमांकावर आहे. तर पिंपरी चिंचवड शहर मिरा भाईंदरच्या तुलनेत निम्म्यावर आहे.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. कोणत्याही गुन्ह्यांची न्यायालयात चार्जशीट पाठविताना ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या नजरेखालून जाते. यामध्ये काही त्रुटी असल्यास त्या तपास अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिल्या जातात. काही प्रकरणांमध्ये पोलीस आयुक्तालयात नियुक्त केलेल्या विधी अधिकाऱ्याचा सल्लाही घेतला जातो.