परवानगी देताना प्रशासन करतेय भेदभाव
माहिती अधिकार कार्यकर्त्याचा पालिकेवर आरोप
पुणे “अलिशान वाहनांमधून भाजी वाहतूक करण्याची परवानगी महापालिका अधिकाऱ्याने आमदार अनिल भोसले यांच्या भावाला दिली आहे. सामान्य लोकांना परवानगी नाकारण्यात आली आहे,’ असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी केला आहे. महापालिका धनिकांना आणि सामान्य नागरिकांना वेगळा न्याय देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
“महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी आमदार भोसले यांचे भाऊ सुनील भोसले यांना अलिशान गाड्यांमधून भाजी वाहतुकीची परवानगी दिली. भाजी वाहतूक टेम्पो किंवा इतर वाहनांमधून होते, पण कंदूल यांनी भोसले यांना अलिशान गाड्यांमधून भाजी वाहतूक करण्याची परवानगी कोणत्या आधारावर दिली,’ असा सवाल आल्हाट यांनी उपस्थित केला आहे. तसेच “आपण कंदूल यांच्याकडे वाहतुकीची परवानगी देण्याची मागणी केली असता, त्यांनी ती नाकारली,’ असा आरोप आल्हाट यांनी केला आहे.
यावर कंदूल यांनी “आपण कोणतेही नियमबाह्य काम केले नसल्याचे सांगत परवानगी भोसले यांना दिल्याचे म्हटले आहे.”आपणाकडे सणस मैदान येथे क्वारन्टाइन केलेल्या नागरिकांच्या जेवणाची जबाबदारी आहे. महापालिकेचे सहआयुक्त आणि मुख्य लेखापरीक्षक अंबरिश गालिंदे यांनी भोसले यांना माझ्याकडे पाठवले होते. भोसले हे नागरिकांच्या जेवणासाठी भाजी आणून देतील, असे म्हणत भाजी वाहतुकीची परवानगी देण्यास सांगितले होते. त्यानुसार आपण भोसले यांनी दिलेल्या गाड्यांच्या नंबरला मांजरी ते सणस मैदान यादरम्यान भाजी वाहतूक करण्याची परवानगी दिली. भोसले यांनी परवानगी घेतली मात्र, त्यानंतर भाजी आणून दिली नाही,’ असेही कंदूल यांनी सांगितले.
आयुक्त म्हणतात…
या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.