दिल्लीहून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींना होतेय बाधा
पिंपरी, (प्रतिनिधी) -“करोना’चा प्रादुर्भाव दिवसें-दिवस वाढतच असून शुक्रवारी सायंकाळी हाती आलेल्या अहवालानुसार पिंपरी-चिंचवडमधील आणखी तीन जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये करोनाचे नवे 14 रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहरातील शुक्रवार सायंकाळपर्यत करोना बाधितांचा आकडा 26 वर जाऊन पोहचला आहे. त्यापैकी सुरुवातीच्या बारा जणांना बरे झाल्यामुहे डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. सध्या शहरातील रुग्णालयांमध्ये “करोना’चे 14 रुग्ण उपचार घेत आहे.
मार्च महिन्यात लागोपाठ 12 रुग्ण शहरात आढळले होते. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष पिंपरी चिंचवडकडे लागले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने उपाययोजना करत त्यावर नियंत्रण मिळवले. घऱोघरी सर्वेक्षण करत परदेशातून आलेले तसेच कन्टेंमेंट झोनमधील नागरिकांना होम क्वांरटाईन केले. त्यामुळे शहरात सलग दहा दिवस एकही नवीन रुग्णांची वाढ झाली नाही. मात्र त्यानंतर दिल्ली निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमातून शहरात आलेल्या नागरिकांना “करोना’ची लागण होण्यास सुरुवात झाली. सोबतच त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांनाही या आजाराने ग्रासण्यास सुरुवात केली आणि रुग्णांचा आकडा आता झपाट्याने वाढू लागला आहे.
दिल्ली येथून आलेल्या दोन जणांना दि. 2 एप्रिल रोजी करोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील एकाला दि.3 एप्रिल रोजी करोनाची लागण झाली. दि. 4 एप्रिल रोजी एकाच दिवशी तब्बल पाच करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यामध्ये दिल्लीतून आलेल्यांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील चार जणांचा तर खासगी रुग्णालयातील एक जणांचा समावेश होता. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांत आठ जणांना करोना विषाणूची लागण झाली. त्यानंतर दिल्लीतून आलेल्या रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील एकाला बुधवारी (दि. 8) लागण झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (दि.9) एकाच दिवशी दोन रुग्णांना करोना विषाणूची लागण झाली. तर आज (शुक्रवारी) एकाच दिवशी तिघांना करोना विषाणूची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने पिंपरी चिंचवडकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
74 संशयित रुग्ण दाखल
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये शुक्रवारी 74 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले हे. त्यांच्या घशातील द्राव पुणे येथील विषाणूविज्ञान (एनआयव्ही) संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
ते बारा रुग्ण ठणठणीत
शहरात मार्च महिन्यात लागोपाठ सापडलेल्या 12 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. चौदा दिवस त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या घशातील द्राव सलग दोनवेळा तपासण्यात आले. त्यामध्ये ते निगेटिव्ह असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना पुढील चौदा दिवसांसाठी घरामध्येच थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच ते बाराही रुग्ण ठणठणीत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.