सामाजिक कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांचे मावळच्या प्रांताधिकाऱ्यांकडे बोट
पुणे – करोनामुळे देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यास मनाई आहे, असे असताना सुद्धा आमदार अनिल भोसले यांचे भाऊ नितीन भोसले यांच्या सासू-सासऱ्यांना मुंबई येथून पुणे येथे आणण्यासाठी मावळचे प्रांताधिकारी यांनी परवानगी दिल्याचे समोर आले आहे.
मुंबई येथून या व्यक्तींना आणल्यानंतर त्यांना विलागीकरण कक्षात ठेवण्यात आले नाही, तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आलेली नाही, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच मावळचे प्रांताधिकारी यांना अशी परवानगी देण्याचे अधिकार आहेत, असा सवाल आल्हाट यांनी उपस्थित केला आहे.
एका बाजूला दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत आहे, त्यामुळे लॉकडाउनच्या आदेशाची कडक अंमलबजावणी होत आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना शहराअंतर्गत परवानगी दिली जात नाही. तर दुसरीकडे आमदारांच्या नातेवाईकांना परवानगी कशी मिळते, असेही आल्हाट यांनी सांगितले. नितीन भोसले यांना त्यांचे सासू-सासरे यांना मुंबई येथील बांद्रा परिसरातून पुण्यातील भोसलेनगर येथे आणण्यासाठी दि,8 एप्रिलला परवानगी दिली.
ही परवानगी मावळचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिली. शिर्के यांना असे पत्र द्यायचे अधिकार आहे का, याची चौकशी करण्याची मागणी आल्हाट यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.त्याचबरोबर मुंबई येथून प्रवास करून आल्यानंतर त्यांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नाही. याबाबतची सुद्धा तक्रार आल्हाट यांनी केली आहे. दरम्यान, याविषयी शिर्के यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही,