मंचर – खडकी पिंपळगाव (ता. आंबेगाव) येथून वास्तू ज्योतिष विशारद हेमंत मंडलिक यांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी थेट युरोप खंडातील फिनलॅंड या देशात ऑनलाइन पद्धतीने वास्तू पूजा केली. तसेच लोकांच्या समस्या समजावून घेऊन त्यांना ऑनलाइन पद्धतीने मोफत समुपदेशन सुद्धा केले जाणार असल्याचे पुरोहित मंडलिक यांनी सांगितले.
देशभरासह राज्यात लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून सगळेच जण “वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना राबवत आहेत.पुरोहित वर्ग सुद्धा याला अपवाद नाही.पुरोहित हेमंत मंडलिक यांचे मित्र विठ्ठल वाबळे हे फिनलॅंड येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेजारी असणारे सुकांत पांडे यांना आपल्या नवीन वास्तूची पूजा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करायची होती. लॉकडाऊन असल्याने कोणत्याही परिस्थितीत पुरोहित मिळणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत विठ्ठल वाबळे यांनी आपल्या गावी असणारे मंडलिक यांना संपर्क केला.
दोन्ही देशातील वेळा भिन्न असल्याने योग्य वेळ निश्चित करून पूजा करण्याचे ठरवले गेले. आणि ऑनलाइन पद्धतीने पूजा करण्यात आली. योग्य मुहूर्तावर पूजा झाल्याचे समाधान त्यांना लाभले. ऑनलाइन पद्धतीने दक्षिणा सुद्धा लगेच खात्यावर जमा झाली. माहिती तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण भागात पोहोचला असून सामन्यातील सामान्य माणूस आज त्याचा उपयोग करू शकतो, हे सिद्ध झाले आहे.
पुढील काही दिवसात लॉकडाऊन वाढले तर अशाच पद्धतीने, लग्न समारंभ सुद्धा केले जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व जण घरातच आहेत. यामुळे बऱ्याच लोकांच्या स्वभावात चिडचिडेपणा, चिंता, भय निर्माण होत आहे. अशा वेळेस काही प्रमाणात लोकांच्या समस्या समजावून घेऊन त्यांना ऑनलाइन पद्धतीने मोफत समुपदेशन सुद्धा केले जाणार असल्याचे पुरोहित हेमंत मंडलिक यांनी सांगितले.