देहूगाव, दि. 30 (वार्ताहर) – देहूरोडमधील शिवाजीनगर येथे अल्पवयीन दोन मुलींचा करोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे देहूमधील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी देहूतील काही मंडळांनी स्वखर्चाने औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. देहूतील हगवणे आळीत करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली आहे. एका व्यापाऱ्याने ग्राहकांचा ताप तपासण्यासाठी यंत्र आणले आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत एकाच कुटुंबातील दोन करोनाबाधित रुग्ण बुधवारी आढळून आल्याचे जाहीर होताच तीर्थक्षेत्र देहूत आणखीनच काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. जागरूक कार्यकर्त्यांमुळे अद्यापपर्यंत देहूत एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र, यापुढेही करोनाने तीर्थक्षेत्र देहूत प्रवेश करू नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. परिसरातील हगवणे आळी येथील जागरूक नागरिकांनी क्रांतिवीर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून संपूर्ण आळीमध्ये औषध फवारणी केली आहे. येथील आत्माराम आगरवाल या किराणा व्यापाऱ्याने ग्राहकांचा ताप तपासण्यासाठी यंत्र आणले आहे. किराणा साहित्य ग्राहकांना देताना फिजिकल डिस्टन्स आणि प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे.
स्थानिक प्रशासन आणि कार्यकर्त्यांनी परिसरात जनजागृती करत कडक बंदोबस्त ठेवला आहे. गावात प्रवेश करणाऱ्या चारही बाजूंनी येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच देहूत येणाऱ्या पाऊलवाटांवरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी या पाऊलवाटा जेसीबीच्या साह्याने खोदण्यात आल्या आहेत.
देहूत जनता कर्फ्यू
करोनाचे सावट वाढत असल्याने देहूकरांनी कठोर निर्णय घेत स्वयंस्फूर्तीने गुरुवारपासून चार दिवसांसाठी म्हणजे तीन तारीख रविवारपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन (जनता कर्फ्यू) घोषित केला आहे. या काळात केवळ मेडिकल, दूध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठीही वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. तर रुग्णालय वगळता सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. चार दिवसीय बंदमध्ये आढळणाऱ्या नागरिकांवर तसेच लपून -छपून व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिक मालकांवर, मोकाट फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी केली असून, गावातील व्यक्तींनाही बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.