ज्येष्ठ लोकप्रिय टीव्ही व चित्रपट अभिनेते शिवाजी साटम यांचे आज अभिष्टचिंतन. त्यांचा जन्म 21 एप्रिल 1950 रोजी देवगड येथे झाला. आज सत्तरी पूर्ण करून अत्तराच्या सुगंधी दशकात ते पदार्पण करीत आहेत. साटम यांनी भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर व्यवसाय प्रशासनात पदविका प्राप्त केली. साटम चंदेरी दुनियेत येण्याअगोदर सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये कॅशियर होते. त्यांना नाटकाची आवड असल्याने बॅंकेत काम करत असताना त्यांनी आंतर-बॅंक नाट्यस्पर्धेत भाग घेतला तेव्हा प्रथम त्यांच्या अभिनयाची चुणूक दिसली.
“संगीत वऱ्हाड’ या संगीत नाटकात त्यांना दिग्गज मराठी रंगभूमी अभिनेते बाळ धुरी यांनी संधी दिली व त्यांचा मंचावर प्रवेश झाला. वर्ष 1975मध्ये “रॉबिन हूड’ या मराठी बालनाट्यापासून त्यांच्या अभिनयाची सुरुवात झाली. इफ्तेखार यांच्यानंतर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका समर्थपणे साकारणारे पहिले मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांतून तसेच टीव्ही मालिकेतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे व अजूनही त्यांचा अभिनय प्रवास सुरूच आहे. वर्ष 1980मध्ये “रिश्ते नाते’ या मालिकेमधून छोट्या पडद्यावर त्यांनी पदार्पण केले. यानंतर जानेवारी 1987 पासून त्यांनी “एक शून्य शून्य’ या मराठी मालिकेत काम केले.
वर्ष 1988मध्ये “पेस्तनजी’ या चित्रपटात डॉक्टरांची भूमिका करून चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला. 2019 मधील कोणताही खलनायक नसलेला “वेडींगचा सिनेमा’ या चित्रपटात काम केले. ते “सी.आय.डी’ मालिकेमध्ये एसीपी प्रद्युम्न यांच्या भूमिकेतून खूपच लोकप्रिय झाले. ही मालिका वर्ष 1998 ते 2018 पर्यंत 20 वर्षे चालली. वर्ष 2004मध्ये “सी.आय.डी’चे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंदवण्यात आले.वर्ष 2012मध्ये एसीपी प्रद्युम्न यांच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
दिवसाला सर्वात जास्त मानधन घेणारे मराठी अभिनेते ठरले आहेत. त्यांनी वास्तव, गुलाम-ए-मुस्तफा, यशवंत, चायना गेट, टॅक्सी क्रमांक 9211, नायक, जिस देश मे गंगा रहता है, सूर्यवंशम, हू तू तू या हिंदी चित्रपटांतून अभिनय केला. वर्ष 1995मधील त्यांनी देव बॅनर्जी दिग्दर्शित इंग्लिश ऑगस्ट व स्प्लिट वाईड ओपन या इंग्रजी चित्रपटांमध्येही अभिनय केला.तसेच हापूस, मी शिवाजी पार्क, दे धक्का या मराठी चित्रपटांतून त्यांनी अभिनय केला.
मरणोत्तर अवयवदान करण्याचा शिवाजी साटम यांनी संकल्प करून एक चांगले उदहारण ठेवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. शिवाजी साटम यांचे पुत्र अभिजित व अनिरुद्ध हेही चित्रपट सृष्टीशी निर्माते व दिग्दर्शक म्हणून जोडलेले आहेत. त्यांची स्नुषा अभिनेत्री मधुरा वेलणकर (अभिजित यांची पत्नी) ही पण आपले स्थान टिकवून आहे. शिवाजी साटम यांना दीर्घायुरोग्य लाभो हीच सदिच्छा.