नर्तिका, दिग्दर्शिका तसेच रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन यामध्ये आपल्या सहज अभिनयाने रसिकप्रिय असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा आज जन्मदिन. (माहेरच्या रोहिणी अनंत ओक). त्यांचा जन्म 11 एप्रिल 1951 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वडील, आई आणि बंधू (रवींद्र ओक) हे तिघेही नाट्यरसिक. त्या सगळ्यांनीच “गावगुंड’ या मराठी नाटकात भूमिका केली होती. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले.
त्यांच्या अभिनयाची सुरुवात पुण्याच्या भावे स्कूलमध्ये झालेल्या नाटकामधून झाली, तसेच अनेक नाट्यस्पर्धांत आणि औद्योगिक आस्थापने आयोजित करीत असलेल्या नाट्यप्रयोगांत त्या भाग घेत राहिल्या. त्यांचे शिक्षण रेणुकास्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल, पुणे मधून झाले.वर्ष 1970 मध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) येथे त्यांनी तीन वर्षे अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. तसेच सुरेंद्र वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम् व कथकली नृत्य या अभिजात भारतीय नृत्यकलांचे त्यांनी धडे घेतले.
शाळेत असल्यापासूनच त्यांना अभिनयाची आवड असल्याने त्या विविध नाट्यस्पर्धांतून भाग घेत असत. नामवंत नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यपरीक्षक निर्माते जयदेव हट्टंगडी यांच्याबरोबर रोहिणी यांचा विवाह 28 मे 1977 रोजी झाला. दोघांनी मिळून रंगभूमीची अनेक वर्षे सेवा केली. नाट्याभ्यास करणारी व प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी या दोघांनी “कलाश्रय’ ही संस्था स्थापन केली. जयदेव यांचे 5 डिसेंबर 2008 रोजी निधन झाले.
वर्ष 1978 मध्ये “अजीब दास्तां’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. फिल्मफेअरचा क्रिटिक्स ऍवार्ड या सिनेमाला मिळाला होता. “अर्थ’, “सारांश’ या सिनेमातील त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. “चक्र’, “अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, “मोहन जोशी हाजिर हो’, “चालबाज’, “अग्निपथ’, “दामिनी’, “मुन्ना भाई एमबीबीएस’ या सिनेमांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांनी 90 पेक्षा अधिक सिनेमांमधून अभिनय केला. रोहिणी यांना चरित्र अभिनेत्री म्हणून मानाचे स्थान आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून खंबीर सासू, भावुक आई, मायाळू आजी प्रेक्षकांच्या समोर उभी केली.
“चार दिवस सासूचे’ ही छोट्या पडद्यावरील रोहिणी यांची सासूची भूमिका असलेली मालिका अनेक वर्षे गाजली. “होणार सून मी या घरची’ या मालिकेतील त्यांची सासूची भूमिकाही खूप गाजली. त्यांनी मराठीबरोबर हिंदी, कानडी, मल्याळम, तेलगू चित्रपटांतूनही अभिनय केला. मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या “चारचौघी’ या मराठी मासिकाच्या रोहिणी हट्टंगडी संपादिका आहेत. त्यांना जागतिक स्तरावरील “गांधी’ या चित्रपटामध्ये कस्तुरबांची अविस्मरणीय भूमिका करण्याची संधी मिळाली. हा त्यांच्या अभिनयाचा एक सन्मानच म्हणावा लागेल. त्यांना मानाचा “फिल्मफेअर’, “बालगंधर्व पुरस्कार’ व “विष्णूदास भावे पुरस्कारा’सह सुमारे 15 पुरस्कार मिळाले आहेत. वाढदिवसानिमित्ताने अभीष्टचिंतन.
माधव विद्वांस