मराठी, हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, मुंबईच्या शेरीफ उषा किरण यांचा आज जन्मदिन. उषा मराठे हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म वसई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात 22 एप्रिल 1929 रोजी झाला. उषा आणि त्यांची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी आपल्या दोघी मुलींना नाटकांत काम करण्यासाठी पाठवावयाचे ठरवले.
वयाच्या बाराव्या वर्षी उषा यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांना “कुबेर’ या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली. मात्र, चित्रपटात काम मिळवायचे तर नृत्य करणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुविख्यात नर्तक उदय शंकर यांच्या नृत्य अकादमीमध्ये प्रवेश घेतला. तसेच बंगाली, गुजराथी, हिंदी, तामीळ आणि इंग्रजी या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळविले.
वर्ष 1948 मधे श्री विजय पिक्चर्स, पुणे निर्मित “सीता स्वयंवर’ या चित्रपटात सहकलाकार म्हणून त्यांनी चंदेरी दुंनियेत प्रवेश केला. त्यानंतर “मायाबाजार’मध्ये त्यांना रुक्मिणीची भूमिका मिळाली. या भूमिकेमुळे त्या लोकप्रिय झाल्या. विश्राम बेडेकर दिग्दर्शित मंगल पिक्चर्सच्या “जशास तसे’ आणि “क्रांतिवीर वासुदेव बळवंत’ यांत केलेल्या त्यांच्या भूमिकांमुळे उषा यांनी आपले स्थान भक्कम केले.
त्यांना प्रमुख नायिकेच्या भूमिकेसाठी मागणी येऊ लागली. तसेच हिंदी सिनेमांचाही यात समावेश होता. त्यांनी अमेय चक्रवर्तीसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकासोबतही काम केले. वर्ष 1950 मध्ये “श्रीकृष्ण दर्शन’मध्ये काम करत असतानाच त्यांनी
स्वतःचे उषा मराठे हे नाव बदलून उषा किरण असे केले. पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या भूमिकेमध्ये बहुविविधता होती. त्यांनी “जशास तसे’ मध्ये डोंबारीण आणि “पुनवेची रात’मध्ये तमासगिरीण तर “बाळा जो जो रे’मध्ये “सोशिक स्त्री’ अशा वेगवेगळ्या भूमिका अप्रतिम साकारल्या. वर्ष 1959 मध्ये माधव शिंदे दिग्दर्शित कोल्हापूरच्या सुरेल चित्र मार्फत प्रदर्शित झालेल्या “शिकलेली बायको’ चित्रपटामध्ये अभिनेते सूर्यकांत यांच्याबरोबर कमलिनीची भूमिका केली. शहरी-ग्रामीण मिश्र वातावरणातील हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्यानंतर 1960 मध्ये कोल्हापूरच्या सुरेल चित्रने “कन्यादान’ या भावप्रधान चित्रपटामधे पुन्हा संधी दिली. यावेळी उषा किरण यांनी राजा गोसावी, दादा साळवी, इंदिरा चिटणीस, नीलम जोग, वसंत शिंदे, सूर्यकांत यांच्याबरोबर भूमिका वठविली. “कन्यादान’मध्ये असलेले अभिनयसामर्थ्य प्रेक्षकांना खूपच भावले.
हिंदीमधे “पतित’ चित्रपटात देव आनंद, “दाग’मध्ये दिलीपकुमार, “काबुलीवाला’मध्ये बलराज साहनी तर “नजराना’मध्ये राज कपूर अशा दिग्गज अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले. त्यामुळे हिंदी सिनेसृष्टीतही त्यांना स्थान मिळाले.
वर्ष 1954 मध्ये डॉ. मनोहर खेर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांनी मोजकेच सिनेमे केले. सिनेमातून संन्यास घेतल्यावर त्यांनी समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतले. मुंबईच्या लोकपाल (शेरीफ) होण्याचा मान त्यांना मिळाला. उषा किरण यांची कन्या तन्वी हिने आईचा अभिनयाचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. उषा किरण यांचे 9 मार्च 2000 रोजी निधन झाले.
माधव विद्वांस