विविधा : केशवराव भोळे

संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक, नाट्यसमीक्षक, केशवराव भोळे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 23 मे 1896 रोजी अमरावती येथे झाला.केशवरावांचा जन्म होण्यापूर्वीच त्यांचे वडील वारले. त्यांचे वडील संगीताचे चाहते होते, तसेच घरातील वातावरणही संगीतमय होते. कुटुंबातील सर्वजण संगीत व नाट्यप्रेमी असल्यामुळे संगीत व नाटकाची आवड निर्माण झाली. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथेच झाले व ते वैद्यकीय अभ्यासासाठी मुंबईला गेले. मुंबईत अनेक नाट्यसंस्था त्यावेळी स्थापन होत होत्या तसेच नाट्यगृह उभी राहात होती. त्यांचे पाय कॉलेजऐवजी नाट्यगृहांकडे वळू लागले. त्यांनी वैद्यकीय अभ्यास सोडून दिला व केशवराव दाते इत्यादी मंडळींच्या सहवासात आले. 

दरम्यान, त्यांचा विवाह ज्योत्स्ना भोळे (पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर) यांच्याशी झाला. डॉ. गजानन चिटणीस श्रीधर वर्तक, अनंत काणेकर, नारायण काळे प्रभृतींसमवेत केशवरावांनी “नाट्यमन्वंतर’ ही संस्था काढली व श्रीधर वर्तक लिखित “आंधळ्यांची शाळा’ हे नाटक रंगभूमीवर आणले. या नाटकाचा प्रथम प्रयोग 1 जुलै 1933 रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला होता. या नाटकामध्ये ज्योत्स्ना भोळे यांनी केलेले बिंबाचे काम खूपच गाजले होते. तसेच ज्योत्स्नाबाईंनी गायलेल्या दोन गाण्यांची स्वररचना केशवरावांनीच केली होती. ह्यामुळे केशवराव संगीताचे नवरचनाकार म्हणून प्रसिद्धीस आले. वर्ष 1933 मध्ये केशवरावांनी “प्रभात’ ह्या सिनेमा कंपनीत संगीत दिग्दर्शक म्हणून प्रवेश केला.

अमृतमंथन, संत तुकाराम, कुंकू, माझा मुलगा, संत ज्ञानेश्‍वर, संत सखू, चंद्रसेना इ. बोलपटांमधील गीतांना त्यांनी संगीतबद्ध केले. याच वेळी ते आकाशवाणी मुंबई केंद्राच्या संगीतविभागाचे प्रमुख झाले.दरम्यान, ते नाट्यसमीक्षा लिहू लागले. केशवरावांनी “एकलव्य’ ह्या टोपण नावाने “वसुंधरा’ साप्ताहिकात लेखन सुरू केले. यामध्ये गायक-गायिकांविषयीचे गुण-दोषांसह सविस्तर माहिती दिली तसेच नाट्य समीक्षाही केली. तेच लेख पुढे “आजचे प्रसिद्ध गायक’ (1933) या पुस्तकात संग्रहित करण्यात आले. ह्या पुस्तकाची सुधारित आवृत्ती म्हणजे “संगीताचे मानकरी’ (1949) होय. “शुद्धसारंग’ याही टोपण नावाने लेख लिहिले.

“सोनियाचा दिवस आजी अमृते पहिला’ व “एक तत्व नाम दृढ धरी मना’ या संत ज्ञानेश्‍वरांच्या रचनेला त्यांनी “संत ज्ञानेश्‍वर’ या चित्रपटासाठी संगीतबद्ध केले. “आधी बीज एकले बीज अंकुरले’ या शांताराम आठवले यांच्या रचनेला त्यांनी “संत तुकाराम’ या चित्रपटासाठी संगीतबद्ध केले. “आला खुशीत समिंदर आला’ या अनंत काणेकर रचित कोळीगीताला त्यांनी संगीतबद्ध केले व ज्योत्स्नाबाईंनी ते गायले. “तुझानी माझा एकपणा कसा कळवा शब्दांना’ हे शांताराम आठवले यांचे गीत त्यांनी संगीतबद्ध केले व माणिक वर्मांनी ते गायले. पुणे येथे 9 नोव्हेंबर, 1977 रोजी त्यांचे निधन झाले.

-माधव विद्वांस

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.