मंचर -नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी, तसेच त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुमारे सव्वाकोटी रुपये खर्च करू नवजात बालउपचार केंद्राची इमारत दोन वर्षांपासून उभी केली; परंतु डॉक्टर, परिचारिका आणि अन्य तंत्रज्ञ, तसेच उपकरणाअभावी इमारत वापराविना पडून आहे.
नवजात बालकांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटल किंवा पुण्याला नेण्यासाठी कुटुंबीय व नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. त्यामुळेच कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे उपचार केंद्र सुरू होण्यासाठी त्वरित लक्ष घालावे, असे साकडे नागरिकांनी त्यांना घातले आहे.
मंचर बसस्थानकाच्या दक्षिण बाजूला 100 मीटर अंतरावर उपजिल्हा रुग्णालयाची इमारत आहे. चांगली आरोग्यसेवा मिळत असल्याने जुन्नर, खेड व आंबेगाव तालुक्यातून दरमहिन्याला बाळंतपणासाठी 200 हून अधिक महिला दाखल होत आहेत.
गर्भवती मातांची दर मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयात तपासणी होते आणि त्यांना सकस आहार, व्यायाम व औषध उपचाराबाबत तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करतात; पण नवजात बालकांचे वजन कमी असल्याचे आढळून आल्यानंतर बाळासह मातेला पुण्याच्या ससून रुग्णालयात किंवा पिंपरी- चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविले जाते. यावेळी बाळाच्या कुटुंबीयांना व नातेवाइकांना फारच धावपळ करावी लागते, त्यामुळे हे उपचार केंद्र त्वरीत करावे, अशी नागरिकांकडून होत आहे.
बाल उपचार केंद्राबाबतच्या सर्व बाबी रुग्ण कल्याण समितीच्या शिष्ट मंडळाने राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानंतर वळसे पाटील यांनी रुग्णालय व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवजात बाल उपचार केंद्राचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार नवजात बालउपचार केंद्राला मंजुरी मिळाली.
– जगदीश घिसे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य,
उपजिल्हा रुग्णालय, मंचर
अतिदक्षता विभागात एकाचवेळी 15 बालकावर उपचार करता येतील अशा पद्धतीच्या 2 इमारती तयार आहेत. येथे पाच बालरोगतज्ज्ञ, परिचारिका व अन्य असे एकूण 15 कर्मचाऱ्यांच्या जागा भरलेल्या नसून आवश्यक ती यंत्रसामग्री येथे उपलब्ध नाही, त्यामुळे बालउपचार केंद्रापासून नवजात बालक वंचित आहेत.
– अरुणा थोरात, जिल्हा परिषद सदस्या
उपजिल्हा रुग्णालयातील नवजात बालक केंद्रची गरज ओळखून येथे केंद्राची इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येथे डॉक्टर परिचारिका कर्मचारी नियुक्त्या व उपकरणे उपलब्ध व्हावीत, म्हणून आरोग्य विभागाकडे उपसंचालक यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे.
– डॉ. चंदाराणी पाटील, वैद्यकीय अधिक्षिका, उपजिल्हा रुग्णालय