आनंदीवाट: फराळाने ऋणानुबंध वाढवूया!

 जयेश राणे

दिवाळी झाली उरले “फराळ’ अशी आज प्रत्येक घरातील स्थिती आहे. दिवाळीत बनवलेला बक्‍कळ फराळ खाणारी कितीही तोंडे असली तरी उरतोच. या उरलेल्या फराळाचं करायचं काय, असा प्रश्‍न सध्या सगळ्यांनाच पडलेला आहे. शेवटी दरवर्षी वापरला जाणारा पर्याय समोर येतो, तो म्हणजे शेजारीपाजारी, नातेवाईक, मित्रमंडळी, इष्टमंडळी यांना दिवाळी फराळ वाटणे.

एकंदरीत दिवाळीपूर्वी काही दिवस फराळ बनविण्याची धावपळ असते. फराळ बनवण्याचे जिन्नस महाग झाले आहेत, असे अनुभवण्यास मिळत आहे. असे असताना यंदाची दिवाळी आणि फराळ यांचे सूत कसेतरी जुळले. महागाई असली तरी कमी पदार्थ बनवू पण ते बनवू. अशी एक विचारधारा असते. तयार फराळ आणि घरगुती फराळ या दोघांचाही उद्देश एकच असतो की प्रकाशाच्या या सणानिमित्त तोंड गोड करणे.

सामान्य माणसाला मात्र फराळ बनवण्याचे जिन्नस, तसेच स्वयंपाकातील नित्योपयोगी वस्तूंचे दर वाढले तरी ते परवडणारे नसते. तुटपुंज्या मिळकतीवर महिना कसा निघेल? याचे गणित जुळवताना दमछाक होत असते. फराळ सर्वांनाच प्रिय असतो. त्या संदर्भातील दरवाढ त्याच्या आनंदात मिठाचा खडा टाकते. यंदा साजऱ्या होत असलेले सण-उत्सवांना गत वर्षांच्या तुलनेत महागाईच्या झळा अधिक सोसाव्या लागत आहेत. धो धो पावसाने अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेल्या पिकांची हानी केली. परिणामी बाजारात मागणी-पुरवठा यांचे गणित व्यवस्थितपणे सुटू शकले नाही. अर्थातच अशा गोष्टींचा परिणाम शेतमालाच्या किमतीत वाढ होण्यात होत असतो. स्वाभाविकच अशा बिकट परिस्थितीतली दिवाळी खर्चिक वाटणे हे आलेच.

ज्या कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ आर्थिक कारणांमुळे परवडणारा नाही त्यांना आपल्याकडचे काही पदार्थ देत त्यांनाही दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घ्यायला पाहिजे. सुख-दु:ख या दोन्ही प्रसंगांत एकमेकांच्या सोबत उभे राहिल्याने खऱ्या अर्थाने माणुसकी जपली जात आहे, असे म्हणता येईल. अन्यथा ती केवळ “बोलाचा भात आणि बोलाची कढी’ ठरेल.

आनंद हा वाटल्याने अधिक द्विगुणीत होतो. असे असताना तो वाटण्यासाठी खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलून समाजऋणाच्या कर्तव्यास जागले पाहिजे. विदेशात असलेल्या भारतीयांना आवश्‍यक असलेला फराळ त्यांच्या नातेवाईकांकडून पाठवण्यात येतो. पिझ्झा, बर्गर, नुडल्स आदींना फराळाची चव कुठे आहे? त्यासाठी भारताकडेच डोळे लावून बसावे लागते. असो. दिवाळीचा फराळ म्हणजे या सणाच्या निमित्ताने ऋणानुबंध वृद्धिंगत करणारी एकजुटीची वज्र मूठ आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.