पुस्तक परीक्षण: मी मवाली तुमच्या हवाली

शर्मिला जगताप

“मी मवाली तुमच्या हवाली’ हे वेगळं शीर्षक असलेल्या या काव्यसंग्रहाचे कवी सुभाषचंद्र ऊर्फ भाई मयेकर आहेत. “मवाली’ हे “विशेषण’, “दूषण’ की “भूषण’ हा प्रश्‍न वाचकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. मुलांचा अतिरेक झाला किंवा मुलगा ऐकत नसला तर आई-वडील त्याला द्वाड, डॅंबीस, लबाडा असेच संबोधतात. म्हणून तो तसा असत नाही किंवा होत नाही, ती पालकांची तात्पुरती सप्रेम प्रतिक्रिया असते.
मवाली हा शब्द उच्चारला की एक समाजकंटक म्हणून आपल्यासमोर प्रतिमा उभी राहते.

समाजात उपद्रव माजवणारा, मुलींची छेड काढणारा, नाक्‍यावरील रस्त्यावर उभा राहून शिट्या मारीत असलेला, मारामारी करणारा, भाईगिरी करणारा… पण आपले घर विसरून इतरांच्या समस्या निवारण्यासाठी सततची धावपळ करणारा, समाजकार्यासाठी नेहमीच तत्पर असणारा, तहान-भूक विसरून एखाद्याच्या दुःखात सामील होणारा, समाजसेवेची आवड असणारा, नेहमी दुसऱ्यासाठी धडपड करणारा, एखाद्या रस्त्यावर उभा राहून विविध विषय सहजतेने हाताळणारा… असाही एक मवाली असू शकतो. हे खरं नवल वाटावं असंच आहे ना… या मवाल्याचा जन्मच मुळी समाजकार्यासाठी वाहून घेतलेला…

कवीचे मन हे स्वच्छंदी, मुक्‍त विचार व सदाचाराचे, शब्दांची जोड आणि समोरील टीकेला तोंड, असे त्याचे विश्‍व. आपल्या भावनांच्या काव्यविश्‍वात रममाण होणारे असते. त्याचे जीवन हे कधीही इतरांना न दुखावणारे, राग, द्वेष, लोभ, मत्सर, अहंकार या गोष्टींपासून अपरिचित असे असणारे नेहमी शब्दांच्या बांधणीत गुरफटलेले असते.

असं म्हणतात की शास्त्र माहीत असेल तरच हातात लेखणी घ्यावी. लेखणी घेतली अन्‌ आपल्या भावना कवीने त्याच्या शब्दसामर्थ्याच्या जोरावर काव्याच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्या. माणुसकीचा चाहता असणारा जो आपल्या शब्दांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणारा. मी माणुसकीचा फॅन आहे, कारण माणुसकी हीच खरी मास्टरकी आहे, असे कवीचे मत या कवितांतून व्यक्‍त होते.

“मी मवाली तुमच्या हवाली’ या काव्यसंग्रहात वेगवेगळे असेच समाजमनाचे, जनमाणसांतले, माणुसकीवर आधारित, समाजमनावर आपला वेगळा ठसा उमटवणारे, समाजातील विविध समस्येवर आधारित, सामाजिक घडामोडी, जनसामान्यांच्या व्यथा तथा आपल्याला आलेल्या अनुभवातून मांडल्या गेलेल्या भावना या शब्दरूपी काव्यसंग्रहातून व्यक्‍त करण्याचा प्रयत्न कवीने केल्याचे आपणास आढळून येते. ग्रंथालीने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.

“प्रेमास्तव एक मवाळ मवाली झाला, लोका मदत करण्यासी सर्वे भवन्तु सुखिन ः हे ब्रीद, मवाल्याची जीवनगाणी’ अशी भावना कवी आपल्या कवितेतून व्यक्‍त करतो.
“मी मवाली, नाही टवाळ समाजमनाची वीणा, मृदंग टाळ’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.