विशेष: आलेख उंचावतोय…

सत्यजित दुर्वेकर

एकाच वेळी दहा उपग्रहांचे प्रक्षेपण करून इस्रोने आणि पीएसएलव्ही या अंतरिक्ष प्रक्षेपकाने आपली विश्‍वसनीयता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. इस्रोने गेल्या काही वर्षांत सातत्याने आपल्या यशाचा आलेख चढता ठेवला आहे. भारत सरकारच्या प्रयत्नांमधून इस्रो आता खासगी क्षेत्राशी भागीदारी करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. यामुळे आर्थिक आणि तंत्रविषयक विकास अधिक वेगाने होण्याची शक्‍यता आहे.

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी दहा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून आपल्या देदीप्यमान प्रगतीच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा विक्रम नोंदविला आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे म्हणजे पीएसएलव्हीचे हे 51 वे उड्डाण होते. या मोहिमेच्या माध्यमातून अमेरिका आणि लक्‍झेम्बर्गचे प्रत्येकी चार आणि लिथुआनियाचा एक उपग्रह या यानाच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आला. याखेरीज भारताने आपला एक उपग्रह अंतराळात पाठविला असून, कोणत्याही हवामानात पृथ्वीची स्पष्ट छायाचित्रे काढण्यास हा उपग्रह सक्षम असेल.

इस्रोने केलेले या वर्षातील हे पहिलेच प्रक्षेपण आहे. करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करीत आपल्या शास्त्रज्ञांनी आणि तंत्रज्ञांनी हे यश प्राप्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात हे वास्तव अधोरेखित केले असून, इस्रोने अनेक अडथळे असतानासुद्धा मिशन वेळेवर पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्‍त केले आहे. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात सध्या मोठी स्पर्धा असून, वेगवेगळ्या देशांच्या सरकारी संशोधन संस्थांबरोबरच खासगी कंपन्याही या बाजारपेठेत जम बसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा काळात उच्च गुणवत्ता आणि कमी खर्च हे सूत्र कसोशीने पाळून इस्रोने आपले स्थान बळकट केले आहे. इस्रोच्या विश्‍वासार्हतेमुळेच अनेक देशांचे उपग्रह भूस्थिर कक्षेत प्रस्थापित करण्याचे काम इस्रोला अनेक देशांकडून दिले जाते.

अमेरिका, जपान, फ्रान्स आणि इस्रायल हे देश प्रक्षेपणाची क्षमता असूनसुद्धा इस्रोच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यास प्राधान्य देतात. संस्थेच्या विश्‍वसनीयतेचा परिणाम म्हणूनच अमेरिका, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, स्वित्झर्लंड यांच्यासह वीस विकसित देशांनी इस्रोच्या माध्यमातून आपल्या उपग्रहांचे प्रक्षेपण आजवर केले आहे. 2017 मध्ये तर इस्रोने एकाच प्रक्षेपणात विविध देशांचे तब्बल 104 उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडून दक्षता आणि क्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण जगासमोर पेश केले होते.

उपग्रह प्रक्षेपणाच्या या बाजारपेठेतून इस्रोला कमाई होते आणि अनुभवाच्या कक्षाही सातत्याने रुंदावत जातात. संशोधन आणि विकासाची प्रक्रिया पुढे नेण्यास हा अनुभव उपयुक्‍त ठरतो. अंतरिक्ष संशोधनात विविध देशांबरोबर भारताच्या अशा सहकार्यामुळे द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संबंध चांगले राखण्यासही मदत मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढते. इस्रोने 1999 मध्ये व्यावसायिक प्रक्षेपण करण्यास सुरुवात केली होती आणि आज पीएसएलव्ही हे अंतरिक्ष वाहनाचा समावेश सर्वांत विश्‍वसनीय प्रक्षेपण यानांमध्ये केला जातो, हे महत्त्वाचे आहे.

भारत सरकारच्या प्रयत्नांमधून इस्रो आता खासगी क्षेत्राशी भागीदारी करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. यामुळे आर्थिक आणि तंत्रविषयक विकास अधिक वेगाने होण्याची शक्‍यता आहे. कारण संचार आणि सुरक्षा या क्षेत्रांत उपग्रहांचे महत्त्व सातत्याने वाढत चालले आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. इंटरनेट आणि मनोरंजनाच्या दुनियेतही उपग्रहांची उपयुक्‍तता वाढत चालली आहे. आतापर्यंतचा अनुभव आणि भविष्यातील आवश्‍यकतांचा विचार केला असता असे म्हणता येते की, अंतरिक्षात इस्रोची उंची आणखी वाढणार आहे. इस्रो आणखी मोठी भरारी घेणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.