वाराणसी – वाराणसी कोर्टाने ज्ञानवापी मशिदीच्या वजूखाना भागाला सोडून इतर भागात भारतीय पुरातत्व खात्याला सर्व्हे करण्यासाठी मंजुरी दिली आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणात हिंदू पक्षकाराचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
“न्यायालयाने भारतीय पुरातत्व खात्याला मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुरातत्व खाते या पाहणीचा अहवाल 4 ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायाधीशांना देणार आहे,’ असल्याचे जैन यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे मुस्लिम पक्षकारांना झटका बसल्याचे मानले जात आहे.
ज्ञानवापी मशीद संकुलात सापडलेल्या शिवलिंगाचे वैज्ञानिक सर्वेक्षण आणि कार्बन डेटिंगला परवानगी देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्या आधी वाराणसी न्यायालयाने या शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगला परवानगी नाकारली होती. त्यानंतर हा वाद अलाहाबाद उच्च न्यायालयात पोहोचला.
अलाहाबाद न्यायालयाने वाराणसी न्यायालयाचा निकाल बदलला आणि ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याची परवानगी दिली. हे शिवलिंग किती जुने आहे याचे वैज्ञानिक सर्वेक्षण करावे असा आदेश अलाहाबाद न्यायालयाने दिला होता.
ज्ञानवापी मशिदीतील ते शिवलिंग किती जुने आहे हे वैज्ञानिक सर्वेक्षणाद्वारे शोधावे लागेल, ते खरोखर शिवलिंग आहे की आणखी काहीतरी आहे याचाही शोध घेण्याचे आदेश अलाहाबाद न्यायालयाने दिले होते.