हावडा – मणिपूरसारखी लज्जास्पद घटना पश्चिम बंगालमध्येही घडून गेल्याचे उघड झाले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवेळी हावडामध्ये एका महिला उमेदवाराला मारहाण करुन तिला नग्न करून गावातून फिरवल्याची घटना समोर आली आहे.
ग्रामपंचायतीच्या एका महिला उमेदवाराने सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर विनयभंग आणि शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
ही घटना गेल्या 8 जुलैची आहे. या दिवशी राज्यात पंचायत निवडणुका झाल्या होत्या. महिला उमेदवाराचा आरोप आहे की तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तिला विवस्त्र केले आणि संपूर्ण गावात तिची धिंड काढली होती. याप्रकरणी पांचला परिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तृणमूलच्या सुमारे 40-50 बदमाशांनी तिला मारहाण केल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे. माझ्या छातीवर आणि डोक्यावर काठीने वार करून मला मतदान केंद्राबाहेर फेकण्यात आले. त्यांनी माझे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला आणि मला नग्न होण्यास भाग पाडले. सर्वांसमोर माझा विनयभंग केला. मला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये तृणमूलचे उमेदवार हेमंत राय, नूर आलम, अल्फी एसके, रणबीर पंजा संजू, सुकमल पंजा यांच्यासह अनेकांची नावे आहेत.