मुंबई – घटनेचे निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अधिकृतपणे राज्यातील महाविकास आघाडीत सामील झाले असून त्यांनी आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेतही भाग घेतला. या बैठकीत कॉंग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. गेले अनेक दिवस त्यांचा हा प्रवेश चर्चेत होता.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेने व्यतिरिक्त, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट तसेच अन्य समविचारी पक्ष या महाविकास आघाडीत सामील आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, या आघाडीतील जागा वाटपाच्या कराराला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून यातील आता फक्त सुमारे दहा जागांचे वाटप होणे बाकी आहे. बाकीचे जागा वाटप निश्चीत झाले आहे.
राऊत यांनी एक्सवर म्हटले आहे की बहुजन विकास आघाडी महविकास आघाडीमध्ये सामील झाल्यामुळे, भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याचा लढा अधिक मजबूत होत आहे. आम्ही झुंडशाहीविरुद्ध लढू. राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड आणि सेनेचे संजय राऊत हे जागावाटप चर्चा समितीचा भाग आहेत.
२०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत, भाजपने २३ मतदारसंघात विजय मिळवला होता, त्यानंतर अविभाजित शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. गेल्या वर्षी फुटलेल्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या, तर प्रत्येकी एक जागा काँग्रेस, एआयएमआयएम आणि एका अपक्ष उमेदवाराला मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीमुळे दलित व मागासांच्या मतांची शिदोरी महाविकास आघाडीला मिळणार असल्याने त्यांना त्याचा या निवडणुकीत लाभ होईल असे सांगितले जात आहे.