प्रशासनाच्या हाकेला मंडळांची साद; वडूज पॅटर्न जिल्ह्यात राबवण्याची गरज
वडूज (प्रतिनिधी) – करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता वडूज शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांनी यंदा सार्वजनिक गणपती बसवू नयेत यासाठी नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने साद घातली होती. त्याला साद घालत शहरातील एकही मंडळ गणपती बसवणार नसल्याचे शहरातील मंडळांच्या पदाधिकार्यांनी प्रशासनाला सांगितले.आज वडूज येथील सौभाग्य मंगल कार्यालयात नगरपंचायत, पोलीस प्रशासन व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी.महामुनी, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष सुनील गोडसे, उपनगराध्यक्षा किशोरीताई पाटील, नगरसेवक अनिल माळी, शहाजीराजे गोडसे,जयवंतराव पाटील,नगरसेवक दिपक बोडरे, सोमनाथ जाधव, राजेंद्र कुंभार व विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेत, पोलीस व नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील मंडळांना एक गाव एक गणपती प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले होते. मात्र, शक्य असल्यास घरगुती गणपतीच बसवावेत असे आवाहन पोलिसांनी केल्यानंतर अनिल गोडसे यांनी शहरात एक ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून हा उत्सव साजरा करणार नसल्याचे सांगितले. तसेच यंदा साध्या पद्धतीने घरगुतीच गणेश उत्सव साजरा करणार आल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाला शहरातील नगरसेवक व विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली.
वडुजच्या नागरिकांनी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. मंडळांनी सार्वजनिक गणेश उत्सव न करण्याचा घेतलेला निर्णय जिल्ह्यात वडूज पॅटर्न म्हणून आदर्श ठरणारा असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी.महामुनी म्हणाले.
मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले, सध्या शहरात करोनाचा प्रभाव वाढत असल्याने प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे. यावेळी शहरातील नगरेसवक, सहाय्यक पोलीस मालोजीराव देशमुख, गणेश मंडळांचे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.