नवी दिल्ली – भारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे रविवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. उत्तर प्रदेश सरकारमध्ये ते मंत्री देखील होते. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शनिवारी संध्याकाळी चेतन यांना लखनऊच्या पीजीआयमधून मेदांता गुरूग्राममध्ये आणण्यात आले होते. मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही तासांपासून त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीही सुधारणा नव्हती. त्यातच त्याची किडनी फेल झाल्यानंतर त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Former Indian cricketer and UP Minister Chetan Chauhan passes away at a hospital in Gurugram.
He had tested positive for #COVID19. (File pic) pic.twitter.com/9viVVURezX
— ANI (@ANI) August 16, 2020
दोनवेळा माजी खासदार म्हणून काम केलेले चेतन चौहान हे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. चेतन चौहान हे भारताकडून 40 कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी 1970 च्या दशकात सुनील गावसकर यांच्यासह सलामीला येताना चांगल्या धावाही केल्या होत्या. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही यशस्वी सलामीवीरांच्या जोडींपैकी एक जोडी आहे.
चेतन चौहान यांनी भारतीय संघाच्या व्यवस्थापकाची भूमिकाही सांभाळली होती. भारतीय संघ जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा ते भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. त्याचबरोबर दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले होते.