वॉशिंग्टन – कोलोरॅडोच्या मतदार यादीमध्ये माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव कायम ठेवण्याचे निर्देश अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. हा ट्रम्प यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. अमेरिकेची संसद असलेल्या कॅपिटल हिलवर ६ जानेवारी २०२१ रोजी ट्रम्प समर्थकांनी धुडगूस घातला होता.
या प्रकरणात ट्रम्प यांचाच हात असल्याचा ठपका ठेवून कोलोरॅडोतील न्यायालयाने ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र ठरवले होते. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.
ट्रम्प यांच्यावरील अपात्रतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले होते. त्यासाठी कॅपिटल हिल प्रकरण म्हणजे बंडखोरी होती का नाही, हे पडताळून बघितले गेले. कॅपिटल हिलवरील हल्ला ही एक प्रतिक्रीया होती, असे ट्रम्प यांच्या बाजूचे म्हणणे होते.
तर बायडेन यांना विजेतेपदाचे प्रमाणपत्र मिळण्यापासून रोखण्यासाठीच हा धुडगूस घातला गेल्यामुळे ही बंडखोरी होती, असे ट्रम्प यांच्या विरोधकांचे म्हणणे होते. मात्र ट्रम्प यांचे नाव मतदार यादीतूनच हटवले जाऊ शकत नाही, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने एकमताने काढला.
प्रांतीय न्यायालयाकडून अध्यक्षीय निवडणुकीच्या उमेदवाराबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो का नाही, याबद्दल न्यायाधीशांमध्ये मतभिन्नता होती. त्यामुळे ५ विरुद्ध ४ अशा फरकाने उमेदवाराला प्रांतीय न्यायालय अपात्र ठरवू शकत नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला.
ट्रम्प यांच्याविरोधात कॅपिटल हिल व्यतिरिक्त इतरही अनेक खटले सुरू आहेत. यातील कॅपिटल हिलच्या प्रकरणामुळे त्यांची निवडणूक लढवणे धोक्यात आले होते.
राज्यघटनेची १४ वी दुरुस्ती…
अमेरिकेच्या राज्यघटनेत झालेल्या १४ व्या दुरुस्तीनुसार बंडखोरांना अध्यक्षीय निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कॅपिटल हिलवरील ट्रम्प समर्थकांचा हल्ला हे प्रकरण बंडखोरीचेच उदाहरण आहे,
का नाही, हे निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून जोरदार वादविवाद सुरू होते. जर कोलोरॅडो न्यायालयाचा निर्णय वैध ठरला असता, तर ट्रम्प यांची अध्यक्षीय निवडणुकीतील घोडदौड थांबली असती.