मराठवाडा मित्रमंडळ संस्थेकडून सन्मान
पुणे – मराठवाडा मित्रमंडळ संस्थेने स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजवंदनाचा मान यावर्षी कोवीड योद्धांना देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला. संस्थेच्या पाच शैक्षणिक संकुलात या योद्धांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
संस्थेच्या डेक्कन संकुलातील ध्वजवंदन करोनाच्या हजारो मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे सामाजिक कार्यकर्ते अरुण जंगम यांच्या हस्ते, काळेवाडी येथील एम.एम. कॉलेज ऑफ फार्मसी शैक्षणिक संकुलातील ध्वजवंदन डॉक्टर्स फॉर बेगर्स अशी ओळख असणारे डॉ. अभिजित सोनावणे यांच्या हस्ते झाले. काळेवाडीच्या एम.एम. विद्यामंदिर येथे ध्वजवंदन कोवीड योद्धा पुरस्काराने सन्मानित कोमल वाघमारे यांच्या हस्ते झाले.
“योद्धा प्रत्यक्ष रणभूमीवर लढतो आणि देशवासीयांची सुरक्षितता अबाधित ठेवतो. आम्हीही देशवासीयांच्या आरोग्यासाठी करोनाच्या रणभूमीवर लढत आहोत. ही लढाई जिंकू हा विश्वास आहे. आमच्या कार्याची दखल घेऊन ध्वजवंदनाचा दिलेला मान आमची कार्यशक्ती अधिक उंचावणारा आहे, अशी भावना यावेळी कोवीड योद्ध्यांनी व्यक्त केली.
लोहगाव शैक्षणिक संकुलातील ध्वजवंदन येरवडा परिसरातील होम आयसोलेशन सेंटरचे प्रमुख डॉ. गिरीश किराड, तर कर्वेनगर येथील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये डेक्क्न पोलीस स्टेशनचे निरीक्षक दीपक लगड यांच्या हस्ते झाले. लगड यांच्या हस्ते अरुण जंगम यांना 51 हजार रुपयांचा धनादेश देऊन संस्थेने त्यांचा गौरव केला.
याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, सरचिटणीस किशोर मुंगळे, कार्यकारिणी सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते. उपप्राचार्य प्रा. स्वाती बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.