मुंबई : देशात केंद्र सरकारकडून कोरोनावरील कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. ज्यानंतर आता लवकरच संपूर्ण देशात कोरोना लसीच्या मूळ लसीकरणास सुरुवात होणार आहे. दरम्यान, लसीकरणाचा ड्राय रन संपूर्ण देशात पार पडत आहे. आज राज्यातही कोरोना लसीकरणाचा सराव अर्थात रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज म्हणजेच 8 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या 30 जिल्हे आणि 25 महापालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणाचे ड्राय रन केले जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्र आणि मनपातील एका आरोग्य केंद्रावर ड्राय रन केले
जाणार आहे. याआधी दोन जानेवारी रोजी पुणे, नंदुरबार, जालन आणि नागपूर जिल्ह्यासह नागपूर मनपा आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये ड्राय रन करण्यात आले होते.
कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी आज केली जाणार असून राज्यस्तरावरुन जिल्ह्यांचे यूजर आयडी तयार करणे, जिल्हा स्तरावरुन आरोग्य संस्थेचे आणि लसीकरण पथकाचे यूजर आयडी तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यांनी चाचणी लाभार्थ्यांची निवड करुन कोवीन अॅपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोवीन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी आणि आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप करणे आणि शितसाखळी केंद्राला कळवणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस आणि वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी 1 ते 4 आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करुन त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आले आहे, असे टोपे यांनी स्पष्ट केले.