मुंबई – राज्यभरातील सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागांसह विविध महापालिका रुग्णालयांमध्ये सुमारे 30 हजार जागा रिक्त आहेत. या सर्व जागा महिना ते दीड महिन्यात भरण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता हा निर्णय घेण्यात आला आहे. या रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी राज्यभरातील आरोग्य विभागात मेगा भरती होणार आहे.
मुंबई महापालिकेने तातडीने रिक्त जागा भरण्यास सुरुवात केली असून राज्यातील इतर ठिकाणी असणाऱ्या जागाही तत्काळ भरण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागात 17 हजार 337 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात 11 हजार जागा रिक्त आहेत. राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असून लॉकडाऊनच्या काळात ही पदे भरण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.
महिनाभरात या सर्व जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी वेगळा विभाग तयार केला जात आहे. परीक्षा न घेता त्यांच्या जुन्या ज्या परीक्षा असतील जसे नर्सिंग कॉऊन्सिल, एमबीबीएसची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क असतील या आधारावर या जागा भरल्या जाणार आहेत. सध्या उपलब्ध असलेले कर्मचारी अथक परिश्रम करत आहे. मात्र त्यांच्या मदतीला नवीन टीम असणे गरजेचे आहे. यामुळे ही भरती तत्काळ करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोरेगाव, मुलुंड येथेही करोना केअर सेंटर्स
करोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी एक लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असून बीकेसी, वरळी एनएससीआय येथे व्यवस्था पूर्ण झाली असून नजीकच्या काळात गोरेगाव, मुलुंड, दहीसर, वरळी दुग्ध वसाहत येथेही लवकरच अशा प्रकारे कोरोना केअर सेंटर्स उभारली जातील.
सोमवारपासून बीकेसी येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरू होईल. याच ठिकाणी एक हजार खाटांचे अतिदक्षता विभाग देखील सुरू केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.