Uttarkashi Tunnel Accident – उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) गेल्या 10 दिवसांपासून अडकलेल्या कामगारांचे कॅमेऱ्याद्वारे घेण्यात आलेले दृष्य मंगळवारी सकाळी समोर आले. त्यामुळे चिंताग्रस्त नातेवाईकांसाठी नवीन आशा निर्माण झाली आहे, बोगद्यात सोडण्यात आलेल्या एका एन्डोस्कोपी कॅमेऱ्याद्वारे या अडकलेल्या लोकांची दृष्ये पहाता आली.
त्यात ते खुषाल असल्याचे दिसत आहेत. या कॅमेऱ्याच्या कनेक्शनद्वारे आतील कामगार बाहेरील यंत्रणांशी बोलू शकत आहेत. तसेच त्यांना आत मध्ये फिरण्यासाठी मोकळी जागाही उपलब्ध असल्याचे समोर आले आहे.
सर्व कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकर्त्यांनी बोगद्याच्या आत पाइपलाइन टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परदेशातील टनेलिंग तज्ज्ञांसह विविध एजन्सींना युद्धपातळीवर हे काम सुरू आहे.
आतील अडकलेले सर्व कामगार सुरक्षित असल्याचे कॅमेऱ्या दृष्यातून पहायला मिळाल्याने त्यांच्या नातेवाईकांना आनंदाश्रु अनावर झाले होते. या संबंधात एका कामगाराच्या पत्नीने वृत्तसंस्थेला सांगितले की, आमच्या आशा आता जागृत झाल्या आहेत.
अडकलेल्या कामगारांसाठी कोसळलेल्या भागाच्या ढिगाऱ्यातून सहा इंच रुंदीची पाइपलाइन बोगद्यात ढकलण्यात आली. 12 नोव्हेंबर रोजी झालोल्या या घटनेनंतर प्रथमच या पाईपलाईनद्वारे कामगारांना गरम खिचडीचा पुरवठा करण्यात आला.
आत्तापर्यंत ते सुका मेवा, तांदूळ आणि चणे यावर जगत होते. कामगारांना नंतर मोबाईल आणि चार्जर देखील दिले जातील जे 6 इंची लाइफलाइनद्वारे बोगद्याच्या आत पाठवले जातील, असे बचाव कार्य प्रभारी कर्नल दीपक पाटील यांनी सांगितले. बोगद्याच्या या भागात वीज आणि पाण्याची सोय आहे आणि 4 इंच कंप्रेसर पाईपलाईनद्वारे खाद्यपदार्थ आणि औषधे पुरवली जात आहेत.