नवीन टिहरी (उत्तराखंड) – उत्तराखंड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात अडकून पडलेल्या सुमारे 50 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. रविवारी धानोलटीजवळील सीतापूर परिसरात हे पर्यटक अडकून पडले होते.
तेथे तुफान पावसामुळे मौंदखला मोसमी प्रवाहाची पाण्याची पातळी अचानक वाढली आणि त्यावरील तात्पुरता पूल कोलमडून पडला. त्यामुळे पर्यटक तेथेच अडकून पडले होते. त्यांच्या बाबतची माहिती मिळाल्यानंतर तेथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला पाठवण्यात आले, त्यांनी या सर्वांची सुरक्षितपणे सुटका केली.
उत्तराखंड मध्ये गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे सर्वच ठिकाणच्या जलकुंभात मोठे पाणी आले आहे. तसेच विविध ठिकाणच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेगही वाढला असून या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन स्थानिक नागरीक आणि पर्यटकांना करण्यात आले आहे.