मुंबई – ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. सूरज चव्हाण हे मुंबई पोलिसांच्या मुख्य कार्यालयात चौकशीसाठी आज हजर झाले. कॅगच्या अहवालावर मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
कॅगने मुंबई महापालिकेच्या बारा हजार कोटी रुपयांच्या खर्चात झालेली कथित अनियमितता अधोरेखित केली होती. पालिकेच्या नऊ विभागांनी केलेल्या एकूण 12000 कोटींच्या खर्चात अनियमितता असल्याचा कॅगचा अहवाल होता. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर एसआयटी स्थापन करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या देखरेखीखाली एसआयटी काम करत आहे.
या प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे. जम्बो कोव्हिड केअर सेंटर घोटाळ्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी मनी लॉड्रिंगचा तपास करणाऱ्या ईडीने सुजित पाटकर आणि दहिसर जंबो कोव्हिड सेंटरचे डीन किशोर बिसुरे यांना अटक केली आहे. ईडीने केलेल्या तपासात समोर आलेल्या माहिती आर्थिक गुन्हे शाखेला सुपूर्त केली. त्याच माहितीच्या आधारे सूरज चव्हाण यांची चौकशी सुरू आहे.