नवी दिल्ली – कर्नाटक उच्च न्यायालयातील सहा न्यायाधीशांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना याबाबतचा एक मेसेज दुबई येथील एका टोळीकडून आला आहे. पाकिस्तानातील बॅंकेत जर 50 लाख रूपये जमा केलेत तरच तुमचा जीव वाचू शकतो असे न्यायाधीशांना धमकावण्यात आले आहे. पोलिसांनी तूर्त या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतला आहे.
उच्च न्यायालयाचे जनसंपर्क अधिकारी के. मुरलीधर यांनी बंगळुरूच्या सायबर क्राइम विभागात तक्रार दाखल केली आहे व पोलीस पुढील तपास करत आहेत. मुरलीधरन यांच्या म्हणण्यानुसार 12 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांच्या ऑफिशियल फोनवर त्यांना व्हॉटसअप्वर एक मेसेज आला. उच्च न्यायालयातील सहा न्यायाधीश निशाण्यावर असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते.
पाकिस्तानच्या अलाईड बॅंक लिमिटेडमध्ये 50 लाख जमा केले नाहीत या सगळ्यांची हत्या केली जाईल असेही मेसेजमध्ये म्हटले होते. न्या. मोहम्मद नवाज, न्या. एच. टी. नरेंद्र प्रसाद, न्या. अशोक जी, न्या. एच. पी. संदेश, न्या. के. नटराजन आणि न्या. बी. वीरप्पा यांना ठार मारू असेही त्यात म्हटले आहे. मात्र याच सहा न्यायाधीशांची त्यांनी नावे का घेतली हे स्पष्ट होऊ शकले नाही.
धमकावणाऱ्यांनी स्वत:ला दुबईतील एका टोळीचे सदस्य म्हटले आहे. तसेच मुरलीधर यांना वेगवेगळ्या नंबरवरून हे मेसेज पाठवण्यात आले आहेत. तुम्हाला ठार मारणारे इंडियन शूटर असतील असेही टोळीने म्हटले आहे. पोलिसांनी या विषयावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे मात्र तपास सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकाच उच्च न्यायालयातील सहा न्यायाधीशांना ठार मारण्याची धमकी मिळाल्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.