लखनौ – उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वच्या सर्व 80 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणण्याचे पक्षाने ठरवले आहे. त्यामुळे पक्षाच्या संकेतानुसार वयाची 75 वर्षे पार केलेल्या उमेदवारांना आता संधी मिळणे अशक्य मानले जात आहे. त्यामध्ये मथुरेच्या खासदार अभिनेत्री हेमा मालिनी, प्रयागराजच्या खासदार सामाजिक कार्यकर्त्या रीटा बहुगुणा यांची नावे येत आहेत. तसेच पक्षात निष्क्रीय रहात, केंद्रिय नेतृत्त्वावर सातत्याने टीका करणारे पिलिभीतचे खासदार वरुण गांधी यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही.
वयाच्या 75 ची निकष पक्षाने कडकपणे लागू केला तर कानपूरचे खासदार सत्यदेव पचौरी, देवरियाचे खासदार रमापती राम त्रिपाठी, बरेलीचे खासदार संतोष गंगवार यांची तिकिटेही कापली जाऊ शकतात.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकीत काही मान्यवरांची उमेदवारी धोक्यात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारमधील काही मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरु शकतात. मात्र याबाबतचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री जितिन प्रसाद शाहजहांपूर किंवा धौरहरामधून, लघुउद्योग मंत्री राकेश सचान फतेहपूरमधून, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री दिनेश प्रताप सिंह रायबरेलीमधून मैदानात उतरु शकतात.
तसेच माजी उपमुख्यमंत्री डॉ.दिनेश शर्मा, देवरियाचे आमदार शाल्भमणी त्रिपाठी, मथुराचे आमदार-माजी मंत्री श्रीकांत शर्मा, सरोजिनी नगरचे आमदार राजेश्वर सिंह, मंथचे आमदार राजेश चौधरी हेही आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतात.