2024 Loksabha Election | तारीख २६ मे २०१४. वार सोमवार. सायंकाळच्या ५.३० – ६ ची वेळ. ४ हजार पाहुणे, दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या परिसरात जमलेले. दिल्लीच्या उकाड्यात बसलेल्या या पाहुण्यांमध्ये विविध देशांचे पंतप्रधान-राष्ट्रपती, भारतातील दिग्गज उद्योगपती, बॉलिवूड स्टार्स, दिग्गज राजकारणी यांचा समावेश होता. त्यांच्या सुरक्षेसाठी १० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. औचित्य होत नरेंद्र दामोदरदास मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचं…
सलग १० वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसला घरी बसवत, २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये देशातील जनतेने भाजपला कौल दिला. ५४३ पैकी २८२ जागा जिंकत भाजप बहुमताने सत्तेत आली. आजच्याच दिवशी म्हणजे २६ मे २०१४ ला नरेंद्र मोदी यांनी, तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडून देशाचे १५वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून गेल्या ९ वर्षांपासून कार्यरत आहेत. पुढील वर्षी, मोदी यांची पंतप्रधानपदाची दुसरी टर्म संपत असून देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करू शकेल असा प्रतिस्पर्धी कोण? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. २०२४ लोकसभा निवडणुकांना आता एका वर्षापेक्षा कमी कालावधी उरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिस्पर्धी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत…
अरविंद केजरीवाल | Arvind Kejriwal 2024 Loksabha Election
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचं नाव घेतलं जातं. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने शिक्षण वीज व आरोग्य क्षेत्रात राबवलेलं मॉडेल देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. केजरीवाल यांनी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे बहुमताने सरकार स्थापन करत आपली ताकद दाखवून दिली आहे. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसवगळता एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये सत्ता असलेला आम आदमी पक्ष हा एकमेव पक्ष आहे. असं असलं तरी गुजरातमध्ये पंजाबमध्ये मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्यात केजरीवाल अपयशी ठरले होते हेही लक्षात घ्यावं लागेल. सध्या दिल्लीतील केजरीवाल सरकार विरुद्ध केंद्रातील मोदी सरकार असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय.
फेब्रुवारी २०२३ मध्ये, इंडिया टुडे व सी वोटर यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या सर्व्हेत पंतप्रधान मोदी यांचे प्रतिस्पर्धी म्हणून केजरीवाल यांना सर्वाधिक पसंती मिळाली होती. विरोधकांनी तिसऱ्या आघाडीचा पर्याय स्वीकारल्यास, २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी केजरीवाल हे मोदींचे प्रतिस्पर्धी ठरू शकतात.
ममता बॅनर्जी | Mamata Banerjee 2024 Loksabha Election
ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हा टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता. भाजपने येथे तृणमूलच्या खंदे शिलेदार तोडत ममता यांना शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र ममता बॅनर्जी भाजपच्या प्रचंड मोठ्या निवडणूक प्रचार यंत्रणेसमोर एकट्या लढल्या. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल पक्ष बहुमत मिळवत पुन्हा सत्तेत आला.
पश्चिम बंगालमध्ये देखील केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष सुरूच आहे. ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांच्या भोवती केंद्रीय तपास यंत्रणांचा फास आवळत असल्याचे ताज्या घडामोडींवरून दिसते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयानंतर, ममता बॅनर्जी यांचे नाव देखील मोदींच्या प्रतिस्पर्ध्यांच्या यादीत घेतले जात आहे.
नितीश कुमार | Nitish Kumar 2024 Loksabha Election
२०२४ लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच भाजपसोबतची युती तोडत नितीश कुमार यांनी, लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली. सध्या नितीश कुमार देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत गाठीभेटी घेत आहेत. नितीश कुमार हे २०१४ पासूनच नरेंद्र मोदी यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. मात्र २०१४ लोकसभा निवडणुकांनंतर त्यांनी मोदींसोबत जुळवून घेत बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद भूषवलं. आता मात्र ते भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडले असून मोदींना देशपातळीवर आव्हान देत आहेत.
हिंदी पट्ट्यातील मुरब्बी राजकारणी अशी नितीश कुमार यांची ओळख आहे. सध्याच्या घडीला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हिंदी पट्ट्यात सर्वाधिक बोलबाला आहे. नितीश कुमार मोदी यांना येथेच आव्हान देतील.
के. चंद्रशेखर राव | K. Chandrasekhar Rao 2024 Loksabha Election
तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून नुकतेच भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगनाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचा या निर्णयामागचा उद्देश पंतप्रधानपदाला गवसणी घालण्याचा आहे, असं जाणकार सांगतात. भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून देशभरात पक्षाचा विस्तार करायचा असा प्लॅन के.चंद्रशेखर राव यांनी आखला आहे. या पक्षाने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
के.चंद्रशेखर राव हे देखील पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार असून ते पंतप्रधान मोदी यांचे प्रखर विरोधक आहेत. केसीआर सध्या राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातूनच देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत त्यांच्या बैठका सुरु आहेत. तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नात असलेल्या नेत्यांमध्ये के.चंद्रशेखर राव यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात.
राहुल गांधी | Rahul Gandhi 2024 Loksabha Election
भारत जोडो यात्रेला मिळालेला उदंड प्रतिसाद, त्यानंतर गमवावी लागलेली खासदारकी व कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेलं प्रचंड यश यांमुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी मोदींचे प्रमुख प्रतिस्पर्धी असतील. देशभरात पसरलेली काँग्रेसची पाळंमुळं राहुल गांधींची दावेदारी अधिक बळकट करतात.
भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांच्या प्रसिद्धीत तर वाढ झालीच आहे. मात्र त्याहूनही महत्वाचे म्हणजे सततच्या पराभवांनी, पक्षांतर्गत बंडाळींनी क्षीण झालेल्या काँग्रेस केडरलाही नवी उभारी मिळाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालातून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाच आहे.
यामुळे, २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी फाईट पाहायला मिळू शकते.
२०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचा प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही कोणत्या नेत्याकडे पाहता हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा…