पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात आणखी 37 जणांना करोनाची लागण झाली. त्यामुळे करोना बाधितांचा आकडा 391 पर्यंत जाऊन पोहचला आहे. त्याशिवाय, शहराबाहेरील मात्र महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तिघांना करोनाची लागण झाली आहे. तर, येरवडा येथील महिलेचा शहरात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक आलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर-चिंचवड, किवळे, भाटनगर, सांगवी, बौद्धनगर-पिंपरी, रुपीनगर, काकडे पार्क-चिंचवड, वाकड, पिंपळे सौदागर, काळेवाडी आदी परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. एकूण 391 करोना बाधित रुग्णांपैकी आत्तापर्यंत 170 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. 214 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यापैकी 191 जणांवर शहरात तर, 23 जणांवर शहराबाहेरील रुग्णालयांत उपचार सुरू आहे. आत्तापर्यंत 7 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
शहराबाहेरील 3 रुग्णांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. येरवडा आणि राजगुरूनगर येथील हे रहिवाशी आहेत. शहराबाहेरील 30 रुग्णांवर सध्या महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, एकूण 10 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे.
दोन परिसर सील-
जुनी सांगवी-ढोरे नगर येथील राज मसाले-योगिता जनरल स्टोअर-ढोरेनगर लेन नंबर 1-जैन मंदिर-सुमनश्री अपार्टमेंट-ढोरेनगर लेन नंबर 2- आनंद सुपर मार्केट – शुभयोग मंगल कार्यालय आदी परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून सील केला आहे. त्याशिवाय, सहयोगनगर-रुपीनगर येथील ओंकार जनरल स्टोअर-बालाजी प्रिंटर्स-नॅशनल गॅरेज-त्रिवेणीनगर रस्ता-अक्षय जनरल स्टोअर्स-गणेश इलेक्ट्रिकल्स आदी परिसर देखील सील करण्यात आला आहे. या दोन्ही परिसरांमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे.