सध्या 21 दिवसांचे लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे मोबाइल व इंटरनेटचा वापर मनोरंजन व विविध अनावश्यक कामासाठी गरजेक्षा जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. अशा अवस्थेत नेटवर्कवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे आवश्यक कामासाठी मोबाइल वापरण्यात अडथळे येऊ शकतात. त्यासाठी सध्याच्या काळात मोबाइल वापरकर्त्यांनी जास्त डेटा न वापरता आवश्यक तेवढाच मोबाइलचा वापर करावा, असे आवाहन मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी केले आहे.
मोबाइल सेवा पुरवणाऱ्या सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी यासंबंधी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये मोबाइलवरील डेटाच्या वापरात 30 टक्के वाढ झाली आहे. कारण नागरिक मनोरंजनाबरोबरच घरातून काम करण्यासाठी मोबाइलचा वापर करीत आहेत.
मोबाइल वापरणाऱ्यांना किंवा संगणक वापरणाऱ्यांनी अनावश्यक डेटा वापर टाळावा. त्यामुळे खेड्यापाड्यातील मोबाइल सेवा, ऑनलाइन शिक्षण सेवा, ऑनलाइन आरोग्य सेवा, बॅंकांच्या सेवा या महत्त्वाच्या सेवांना डेटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. त्याचबरोबर आवश्यक कामासाठी इंटरनेटचा वापर ज्यावेळी जास्त होतो (पीक अवर्स) त्यावेळेस मोबाइल वापरकर्त्यांनी इंटरनेट आणि मोबाइलचा वापर करणे टाळावे. म्हणजे सकाळ आणि सायंकाळी मनोरंजनासाठी इंटरनेटचा वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.