वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 24 आणि 25 फेब्रुवारी असे दोन दिवस भारत दौऱ्यावर येत आहेत. व्हाईटहाऊस मधून त्यांच्या निवडीची ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा ट्रम्प यांचा हा पहिला भारत दौरा आहे. या दौऱ्यात त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी मेलॅनिया ट्रम्प याही भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत दौऱ्यात त्यांचा अहमदाबाद दौराही ठेवण्यात आला आहे.
या आधी अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा हे सन 2010 आणि 2015 या साली भारत दौऱ्यावर आले होते. अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्यात गेल्या आठवड्यात दूरध्वनीवर चर्चा झाली होती. त्यावेळी भारत दौऱ्याविषयी चर्चा झाली होती. या भेटीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांतील जनतेमध्येही भावनिक बंध निर्माण होतील असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला होता. अमेरिकेतील भारतीयांच्या संघटनेचे नेते व दानशुर एम. आर रंगास्वामी यांनी या संबंधीत पीटीआयशी बोलताना म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारविषयक काही वादंग निर्माण झाले आहेत या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला महत्व आहे. भारताबरोबरच्या संबंधांना अमेरिकेचे अध्यक्ष महत्व देत असल्याचे त्यांच्या या दौऱ्यामुळे स्पष्ट होत आहे असेही त्यांनी म्हटले आहे.