हिंसाचारात सहभागी झालेल्यांना योग्य शिक्षा केली जाईल : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन  – कॅपिटॉल हिलमध्ये ट्रम्प समर्थकांनी घातलेल्या हिंसाचारप्रकरणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोहाची कारवाई करण्यात येणार आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत कॅपिटॉल येथील हिंसाचाराचा निषेध केला आहे. तसेच शांतता राखण्याचे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि, हिंसाचार मी विश्वास ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीविरोधात तसेच आपल्या चळवळीविरोधात आहे. माझा खरा समर्थक असा राजकीय हिंसाचार करणार नाही. माझा कोणताही समर्थक अशा पद्धतीने कायद्याचा आणि आपल्या ध्वजाचा अपमान करणार नाही. आपल्या नागरिकांना अशा पद्धतीने धमकावणार नाही. यापैकी तुम्ही काहीही केले असेल तर तुम्ही चळवळीला पाठिंबा देत नाही. तर तुम्ही त्यावर हल्ला करत आहात. तुम्ही आपल्या देशावर हल्ला करत आहात आणि हे सहन केले जाणार नाही.

कोणतीही माफी, अपवाद नाही. अमेरिकेत कायद्याचे राज्य असून हिंसाचारात सहभागी झालेल्यांना योग्य शिक्षा केली जाईल, असे आश्वासनही यावेळी ट्रम्प यांनी दिले आहे.

सोशल मीडिया कंपन्यांनी टाकलेल्या बंदीचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, हा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. आपल्या काही लोकांना सेन्सॉर किंवा ब्लॅकलिस्ट करण्याचे प्रयत्न चुकीचे आणि घातक आहेत. सध्या आपण एकमेकांचे ऐकून घेण्याची गरज आहे, एकमेकांना शांत करण्याची नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हटवण्यासाठी उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी 25 वी घटनादुरुस्ती लागू करावी, अशी सूचना करणारा ठराव आज प्रतिनिधीगृहामध्ये मंजूर करण्यात आला. 223-205 अशा फरकाने हा ठराव मंजूर करण्यात आला. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्राबल्य असलेल्या प्रतिनिधीगृहामध्ये हा ठराव्‌ मंजूर होण्यास विशेष अडचण आली नाही. पक्षभेद विसरून रिपब्लिकन पक्षाच्या काही सदस्यांनीही या ठरावाच्या बाजूने मतदान केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.