नवी दिल्ली – चीन विरोधातील संघर्षात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे समर्थन करतील असे आपल्याला वाटत नाही, असे अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे. एका अमेरिकन दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मतप्रदर्शन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, चीन आपल्या भागातील देशांशी अत्यंत विक्षिप्तपणे व्यवहार करीत आहे. त्यांचे भारताबरोबरच जपानशीही संबंध बिघडले आहेत.
अशा स्थितीत चीनच्या विरोधात अमेरिका भारताचे कितपत समर्थन करेल असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की ट्रम्प हे चीनच्या विरोधात भारताच्या बाजूने उभे राहतील असे वाटत नाही. त्यांना सारी राजकीय भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन पावले टाकावी लागतील आणि व्यापाराच्या दृष्टीकोनातूनही त्यांना चीनच्या संबंधात भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे ते चीनच्या विरोधात भारताची बाजू घेण्याची शक्यता नाही. नोव्हेंबर मध्ये त्यांची अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली तर ते चीनशी व्यापाराच्या बाबतीत पुन्हा जुळवून घेतील असा अंदाज त्यांनी वर्तवला.
चीन आणि भारत यांच्यातील संघर्ष अनेक दशकांचा आहे. आणि याची सारी पार्श्वभूमी ट्रम्प यांना माहिती आहे. त्यामुळे ते भारत आणि चीन या बाबतीत कोणाच्याच बाजूने उभे राहणार नाहीत असे ते म्हणाले.