माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांची खरमरीत टीका
सोशल मीडियावरून लोकांना झापण्याचा उद्योग; अमेरिकेत अराजक माजवले
न्यूयॉर्क – अमेरिकेतील निवडणुकीचे राजकारण आता तापू लागले असून माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी आज विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली आहे. ट्रम्प यांच्यासाठी अध्यक्षपद म्हणजे केवळ तासन्तास टीव्ही पाहणे आणि सोशल मीडियातून लोकांना झापणे एवढ्यापुरतेच मर्यादित आहे. त्यांच्या काळात व्हाईट हाऊस म्हणजे केवळ एक गोंधळाचे केंद्र बनून राहिले आहे. वास्तविक व्हाईट हाऊस म्हणजे अमेरिकेचे एक कमांड सेंटर असायला हवे होते पण ट्रम्प यांनी तेथे अराजक माजवले.
ट्रम्प यांनी आपल्या कोणत्याही कृत्याची जबाबदारी घेतली नाही. त्यांनी केवळ दुसऱ्यांना दोष देऊन दिवस काढले, अशी सणसणीत टीका क्लिंटन यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला आता ट्रम्प काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांच्या काळात देशाच्या बेरोजगारीचा दर तिप्पट वाढला आणि ते आम्ही जगाचे नेतृत्व करीत आहोत असा दावा करीत आहेत, असे क्लिंटन म्हणाले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. ते म्हणाले की, करोनाने सारा देश उद्ध्वस्त झाला असून या रोगाने अमेरिकेतील 1 लाख 70 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशातील लक्षावधी नोकऱ्या बुडाल्या असून देशातील सर्व छोटा व्यापार पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. या आणीबाणीच्या काळात व्हाईट हाऊस हे देशाचे कमांड सेंटर व्हायला हवे होते. पण तेथे ट्रम्प यांच्या काळात केवळ गोंधळच माजला होता.
ट्रम्प यांनी करोनाची स्थिती अत्यंत बेपवाईने हाताळली, असा आरोपही त्यांनी केला. पण त्यांनी मात्र रोज टीव्हीवर येऊन आपण किती महान कामगिरी केली याचाच सातत्याने पाढा वाचला. व्यर्थ बडबडीशिवाय ट्रम्प यांनी काहींही केले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांना पुन्हा निवडून द्यायचे काय याचा फेरविचार झाला पाहिजे, असे क्लिंटन यांनी नमूद केले.