टेनसेंटच्या अहवालातील माहितीने जगभर खळबळ, कोरोना सार्सपेक्षा घातक?
तैपाई : चीनमध्ये कोरोना व्हायरसने प्रत्यक्षात 24 हजार 589 मरण पावले आहेत, अशी माहिती चीनी बहुराष्ट्रीय कंपनी टेनसेंटने दिली आहे. चीनने जाहीर केलेल्या 500 या मृतांच्या संख्येपेक्षा ही संख्या बरीच मोठी आहे. याबाबतचे वृत्त तैवान न्यूजने दिले आहे.
टेनसेंटने हे वृत्त अनावधानाने प्रसिध्दीस दिले असावे कारण त्यात दिलेली आकडेवारी चीनने अधिकृतरित्या जाहीर केलेल्या मृत आणि बाधीतांच्या आकडेवारीपेक्षा काही पटींनी अधिक आहे. टेनसेंटच्या अधिकृत वेबपेजवर दिलेल्या एपिडेमिक सिच्युएशन ट्रॅकर या नावाने हा अहवाल देण्यात आला आहे. त्यात बाधीतांची संख्या एक लाख 54 हजार 23 असल्याचे म्हटले आहे. चीनने एक फेब्रुवारीला (हा अहवाल प्रसिध्द झाला तो दिवस) जाहीर केलेल्या संख्येपेक्षा ही संख्या दहापट अधिक आहे. त्यात संशयित रुग्णांची संख्या 79 हजार 808 असल्याचे म्हटले आहे. ही संख्या चीनने जाहीर केलेल्या संख्येपेक्षा चौपट अधिक आहे.
या आजारातून बरे झालेल्यांची संख्या 269 असल्याचे म्हटले आहे. तर चीन प्रशासन मात्र ही संख्या 300 असल्याचे सांगत आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे मृतांची संख्या 24 हजार 589 असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यादिवशी चीनने जाहीर केलेल्या मृतांच्या संख्येपेक्षा ही संख्या 300 पट अधिक आहे.
एकदा ही बाब लोकांच्या नजरेत आल्यानंतर टेनसेंटने आपल्या आकड्यात बदल करत सरकारच्या आकड्यांशी साधर्म्य असणारी संख्या जाहीर केली. टेनसेन्टने चीन सरकारने मंजूर केलेल्या संख्येपेक्षा खूप अधिक संख्या तीन वेळा जाहीर केली असल्याचे निरीक्षण नेटीझन्सनी नोंदवले आहे.
काही जणांच्या मते हा कोडींग समजण्यात झालेल्या नजरचुकीने हा आकडा आला असावा. तर काहींच्या मते कोणीतरी वास्तव संख्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. या अहवालावर टेनसेंटने अधिकृत भाष्य केले नाही. वुहानमधून अनेक मार्गांनी मिळालेल्या माहितीनुसार, अनेक कोरोना बाधीतांना उपचार मिळाले नाहीत. ते रुग्णालयाबाहेर मरण पावले आहेत. अनेक मृतदेहांवर त्यांची मृत्युत गणना करण्या आधी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, असे या वृत्तात म्हटले आहे.
चीनमधून बाधीतांची सांगितली जाणारी संख्या संशयास्पद असल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे. जर टेनसेंटची आकडेवारी योग्य असेल तर कोरोनाचा मृत्यू दर 16 टक्के होतो. सार्सच्या मृत्यू दरापेक्षा (9.6) तो खूपच अधिक आहे, असे सीएनएन या वृत्त संस्थेने म्हटले आहे. काईजींग या बिजिंगमधील मासिकाने कम्युनिस्ट पक्षाचे सरकार प्रत्यक्षापेक्षा मृतांची आणि बाधीतांची संख्या खूपच कमी सांगत आहे, असे आपल्या एका लेखात म्हटले आहे.