अमेठी- अमेठी जिल्ह्यातील मोहनगंज पोलीस ठाण्याच्या महिला चौकीच्या प्रभारी उपनिरीक्षकाने शासकीय निवासस्थानी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. महिला निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली होती. या संशयावर अखेर पडदा पडला आहे. महिला उपनिरीक्षक रश्मी यादव यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
सुरेंद्र सिंह उर्फ रिशू असे आरोपीचे नाव असून पोलीसांनी यास अलीगढ येथून अटक केली आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक दिनेश सिंह यांनी दिली आहे. मोहनगंज पोलिस ठाण्यात या प्रकरणी रश्मी यांचे वडील मुन्ना लाल यादव यांनी तक्रार दाखल केली होती.
रश्मी यांचे वडील आपल्या आरोपात म्हणाले की, रश्मी पोलीस दलात येण्यापुर्वी बहराइचमधील एका प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. यावेळी तिच्या संपर्कात सुरेंद्र आला होता. जो डायटमध्ये काम करायचा. दरम्यान सुरेंद्र व रश्मीची एका ट्रेनिंग सेंटर मध्ये मैत्री झाली त्यानंतर त्यांच्यामध्ये संबंध प्रस्तापित झाले. सुरेंद्रशी असलेल्या संबंधांमुळे मुलीचा घटस्फोट झाला. तो माझ्या मुलीबद्दल अपशब्द वापरून तिला त्रास द्यायचा त्यामुळे वैतागून रश्मीने आपले जीवन संपवले.असे रश्मीच्या वडिलांनी आरोपात म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.