कोलोंबो – श्रीलंकेत इंधनाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल पंपांवर लोकांच्या लांबच लाब रांगा लागायला लागल्या आहेत. कोलोंबो येथील मुख्य पेट्रोल वितरण केंद्राबाहेर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांनी रास्ता रोको केल्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. सोमवारी ऑईल खरेदी करू न शकलेल्या नागरिकांनी या आंदोलनातून आपला रोष व्यक्त केला होता. इंधन खरेदीसाठी लागलेल्या लांब रांगांमध्ये ताटकळत थांबलेल्या तीन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पेट्रोल पंपांवर लष्कराची सुरक्षा तैनात करावी लागली आहे.
श्रीलंकेसमोर सध्या परकीय गंगाजळीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. परकीय गंगाजळीच्या संकटामुळे श्रीलंकेच्या चलनाचे मोठे अवमूल्यन झाले आहे. अन्न पदार्थ, औषधे आणि इंधनासारख्या आवश्यक वस्तूंच्या आयातीसाठी श्रीलंकेला झगडावे लागत आहे. त्यासाठी श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे हात पसरायची वेळ आली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक पेट्रोल पंपावर दोन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत, असे लष्कराचे प्रवक्ते निलांथा प्रेमरत्ने यांनी सांगितले. देशात उद्भवलेली अभूतपूर्व इंधन टंचाईबाबत विचार करण्यासाठी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताभाये राजपक्षे चांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र विरोधकांनी या बैठकीवरब हिष्कार घातला आहे.