काबूल – तालिबानने अफगाणिस्तानमधील मुलींना इयत्ता सहावीच्या पुढील शिक्षणासाठी शाळेचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अफगाणिस्तानमधील सत्तेची सूत्रे ताब्यात घेताना मात्र तालिबानने आपली कट्टरवादी प्रतिमा बदलून मुलींच्या शिक्षणासाठी अनुकूल भुमिका घेतल्याचे दर्शवले होते. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्यता मिळवण्याचा तो एक प्रयत्न होता, असे आता स्पष्ट झाले आहे.
मुलींना उच्च शिक्षणासाठी परवानगी नाकारण्याचा निर्णय बुधवारी तालिबानच्या प्रशासनाकडून अगदी अनपेक्षितपणे जाहीर करण्यात आला. अफगाणिस्तानमधील शालेय वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय देणगीदारांकडून तालिबानला अपेक्षित असलेली संभाव्य मदत आता मिळू शकणार नाही.
मुलींना शाळेचे दरवाजे उघडावेत आणि न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवले जाऊ नये, अशी मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तालिबानकडे सातत्याने केली जात आहे. शिक्षण मंत्रालयाने आठवड्याभरापूर्वी एक निवेदन जाहीर करून सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे आवाहन केले होते. मात्र मुलींनी शाळेत येण्याचा निर्णय अफगाणिस्तानमधील कट्टरवाद्यांच्या दबावामुळे फिरवण्यात आला.
मुलींना शाळेत न जाऊ देण्याचा निर्णय मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार आणि देणगीदारांसाठीचे प्रतिनिधी वहिदुल्ला हाश्मी यांनी ही माहिती दिली.
तालिबानने मुलींच्या महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणावर यापूर्वीच बंदी घातली आहे. मात्र अगदी तुरळक भागांमध्ये मुलींना अजूनही शिक्षण मिळू शकते आहे. मात्र देशातील बहुसंख्य महाविद्यालये आमि विद्यापिठानी महिला आणि मुलींना प्रवेश बंद केला आहे.