पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन ऍन्ड लिंकेजेस’तर्फे करोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या उपायांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी संशोधक, नवउद्यमींनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
जगभरात करोना विषाणू संसर्गाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे जगभरातील देशांकडूून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील मायलॅब या कंपनीने करोना विषाणू संसर्गाची चाचणी कमी खर्चात करून देणाऱ्या किटला मान्यता मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील संशोधक, नवउद्यमींना पाठबळ देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.
विषाणू, संसर्ग या विषयात संशोधक काम करत असतात. त्यामुळे त्यातील काही संशोधकांनी संसर्ग रोखण्यासाठीचे उपाय शोधले असल्यास करोना बाधितांनी उपचारांनंतर चांगल्या आरोग्यासाठी काय काळजी घ्यावी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुलभ होणे या संदर्भातील काही नवकल्पना असल्यास त्याचा प्रस्ताव पाठवावा. या प्रस्तावांची तातडीने छाननी करून त्याच्या अंमलबजावणीबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन ऍन्ड लिंकेजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले.
करोना विषाणू संसर्ग उपायांच्या नवकल्पनांचे मागवलेले प्रस्ताव हे अंमलबाजवणीच्या स्तरावरील, किमान प्रारूप स्तरावरील असावेत. जेणेकरून तज्ज्ञांकडून त्याची छाननी करून घेऊन पुढील प्रक्रिया करणे शक्य होईल. त्यासाठी जो काही निधी लागेल, तो उपलब्ध करण्याची जबाबदारी विद्यापीठाकडून घेतली जाईल. मात्र, सध्या संशोधन सुरू असलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. कारण सध्या तातडीने अंमलात येऊ शकणाऱ्या कल्पनांची आवश्यकता आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ