नवी दिल्ली – 2025 पासून सर्व ट्रकमध्ये क्रू मेंबर्ससाठी एसी कंपार्टमेंट असणे आवश्यक आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, ज्या दिवसापासून मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, त्या दिवसापासून मला ट्रकच्या केबिनमध्ये एसी कंपार्टमेंट सुरू करायचे आहे. मात्र, काही लोकांनी यामुळे खर्च वाढेल असं म्हणत याला विरोध केला. मात्र, आज (१९ जून) मी या निर्णयाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे,” असंही नितीन गडकरींनी नमूद केल आहे.
गडकरी म्हणाले की, ‘ट्रकच्या वाढत्या किमतीबाबत लोक सातत्याने तक्रारी करत आहेत. असे असतानाही ट्रकच्या केबिनमध्ये एसीची सुविधा दिली जात नाही. पण आज या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी ट्रक चालकाच्या केबिनमध्ये एसी अनिवार्य करणाऱ्या फाईलवर सही केली आहे. गडकरी पुढे म्हणाले, ट्रक चालवणाऱ्या लोकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.’
रस्त्याच्या कडेला 570 सुविधेचे काम प्रगतीपथावर
राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांच्या कडेला असलेल्या सुविधा सुधारण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याची ग्वाहीही केंद्रीय मंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की माझे मंत्रालय 570 रोड साइड सुविधा केंद्रांवर काम करत आहे. यापैकी 170 निविदा दाखल झाल्या असून कामही सुरू झाले आहे. महामार्गाच्या प्रत्येक 50 किलोमीटरवर एक सुविधा निर्माण करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.