मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच यशस्वीरीत्या मानेची शस्त्रक्रिया पार पडली. दरम्यान त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे राज्य सरकारकडून आणि अनेक मंत्र्यांकडून देखील स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी एका शिवसेना कार्यकर्त्याने पायी तिरुपती जाण्याचा प्रवास सुरु केला होता. मात्र त्याचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उपचार सुरू असताना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांकडून सातत्याने प्रार्थना करण्यात येत होत्या. अशाच एका कट्टर शिवसेना कार्यकर्त्याने उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपती बालाजीला साकडे घालण्यासाठी बीड ते तिरूपतीपर्यंत पायी जाण्याचा निर्धार केला होता. पण दुर्दैवाने त्यांचा हा निर्धार पूर्ण होऊ शकला नाही.
बीडमधील शिवसेनेचे नेते आणि माजी नगरसेवक सुमंत रुईकर हे कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित होते. उद्धव ठाकरेंच्या प्रकृती अस्वास्थ्याचे वृत्त कळताच त्यांनी पक्षाध्यक्षांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. एवढंच नाही, तर त्यांनी यासाठी तिरूपती बालाजीला साकडे घालण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बीडपासून थेट तिरुपती बालाजीपर्यंत पायी चालत जाण्याचा निर्धार त्यांनी केला.
मोठ्या हिंमतीने ४७ वर्षीय सुमंत रुईकर पायी चालत निघाले. तेलंगणा राज्यात ते पोहोचले देखील. पण तिरुपतीला पोहोचण्याआधीच त्यांची प्रकृती बिघडली. स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांच्या उपचारांना त्यांच्या शरीराने साथ दिली नाही. अखेर तिरुपतीला जाण्याचा त्यांचा निर्धार पूर्ण होऊ शकला नाही. वाटेतच त्यांचे दुर्दैवी निधन झाले.