सर्व प्रकारची दुकाने, कार्यालये, हॉटेल, खानावळ बंद
पुणे – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या अधिकाराचा वापर केला आहे. या आदेशानुसार पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात खासगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे समारंभ, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव, जत्रा, उरुस, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व सर्व स्पर्धा परीक्षा यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहित कारणाशिवाय येण्यास मनाई करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत करोना विषाणूचे संसर्गबाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशांतर्गत विमानाद्वारे प्रवासी भारतात प्रवास करत आहेत. या प्रवासी पुणे जिल्ह्यामध्येही परदेश प्रवास करून आलेले आहेत व बरेच प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत.
त्यामुळे करोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता. त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व करोनाचे संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता, त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. अशा प्रवाशांमुळे करोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे आदी बाबी टाळणे अत्यावश्यक आहे. करोनाच्या प्रसाराचे प्रमाण पाहता, या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्यांच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेता, जिल्हाधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत.
या गोष्टींवर राहणार निर्बंध
– खासगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास बंदी
– मिरवणूक, मेळावे, बैठक, आंदोलने, सभांवर बंदी
– पुणे दर्शनसारख्या सहली, देशांतर्गत व परदेशी सहली आदींचे आयोजन करण्यास मनाई
– अत्यावश्यक विषयांखेरीज इतर शासकीय बैठकांस मनाई
– हॉटेल, खानावळ, शॉपिंग मॉल्स, क्रीडांगणे, मैदाने, खासगी शिकवणी वर्ग, ऑनलाइन लॉटरी सेंटर, मनोरंजनाची ठिकाणे
हे राहणार सुरू
– शासकीय/ निमशासकीय कार्यालये
– अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालये, पॅथोलॉजी लॅब, दवाखाने
– सर्व प्रकारचे वैद्यकीय, नर्सिंग कॉलेज
– किराणा सामान दुकान, दूध, फळे भाजीपाला, औषधालये,
– रेल्वे स्टेशन, एसटी स्थानक, पीएमपी स्थानके, विमानतळ व रिक्षा थांबे
– अंत्यविधी
– सर्व हॉटेल, लॉज येथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन
– रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवून देण्यास परवानगी राहील.
– केवळ परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी खानावळ, महाविद्यालय, वसतिगृह येथील मेस, कॅन्टिन
– इयत्ता 10 वी 12 वी तसेच राज्य शासन व केंद्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, विद्यापीठ यामध्ये शैक्षणिक काम पाहणारी व्यक्ती
– दैनिक, नियतकालिके, टीव्ही न्यूज चॅनेल.