लखनौ – विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर समाजवादी पक्षाने (एसपी) शनिवारी आमदारांची बैठक बोलावली होती. बैठकीत सत्ताधारी भाजपला आगामी काळात विविध मुद्द्यांवर घेरण्याची व्यूहरचना करायची होती. मात्र त्याआधीच पुन्हा एकदा ‘सपा’तील अंतर्गत कलहाचे संकेत मिळत आहेत.
अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा काका शिवपाल यादव यांना मोठा धक्का देत त्यांचे पंख छाटण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून लखनौमध्ये तळ ठोकून बसलेल्या शिवपाल यादव यांना पक्षाच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नाही. शिवपाल यादव यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे.
प्रगतीशील समाजवादी पक्षाचे प्रमुख शिवपाल यादव हे जसवंतनगर मतदारसंघातून सपाच्या निवडणूक चिन्हावर लढले होते. अशा स्थितीत शिवपाल यादव यांना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बोलावले जाईल, अशी आशा होती.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शिवपाल यादव म्हणाले की, आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते दोन दिवसांपासून लखनऊमध्ये थांबले होते. शिवपाल म्हणाले की, मला पक्षाच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. मी दोन दिवस वाट पाहत होतो. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मी माझे इतर सर्व कार्यक्रम रद्द केले. पण मला बोलावले गेले नाही.
दरम्यान शिवपाल यादव यांना त्यांचे पुढचे पाऊल काय आहे, असं विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी पत्ते उघडण्यास नकार दिला. तसेच समर्थकांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असं सांगितलं.