हिंजवडी – रावेत येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मुळशीत सर्वच रस्त्याच्या कडेला विनापरवाना शेकडो महाकाय होर्डिंग उभारले असल्याची धक्कादायक माहिती ग्रामपंचायत स्तरावर केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
निसर्ग सौंदर्यामुळे देशविदेशी पर्यटकांची वर्दळ असलेल्या या तालुक्यात एकीकडे हिंजवडी, माणचे आयटीपार्क, पिरंगुट औद्योगिक वसाहत तसेच लवासा सहारासारख्या सिटी तर दुसरीकडे पुणे व पिंपरी चिंचवडचे प्रवेशद्वार असलेल्या मुळशी तालुक्यात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाला असल्याचे चित्र सध्या मुळशीतील गावोगावी पाहायला मिळत आहे.
मुळशी तालुक्यातील सर्वच्या सर्वच लोखंडी होर्डिंग विनापरवाना उभे केलेले आहेत. प्रशासनाकडे आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार तालुक्यात एकूण लोखंडी होर्डिंगची संख्या केवळ 364 आहे. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या 500 ते 700 असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ही आकडेवारी गेल्या पाच दिवसांपूर्वी पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडून मागवून घेतलेली आहे. मात्र, ही आकडेवारीही लपवाछपवी केलेली किंवा काही ठिकाणी अंदाजे नोंदविली असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. बऱ्याच ग्रामपंचायतींनी अचूक आकडेवारी न देता त्यात काहीशी लपवाछपवी केलेली आहे. इतकेच काय या आकडेवारीत घोटावडे येथील तसेच कोळवण खोऱ्याकडील करमोळी, चाले तसेच कोळवणपर्यंतच्या होर्डिंगची आकडेवारीच नाही.
गेल्यावर्षी वादळी वाऱ्यात होर्डिंग कोसळले
अनधिकृत लोखंडी होर्डिंग कोसळण्याच्या हिंजवडी परिसरात दोन ते तीन घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी विप्रो सर्कलला एक महाकाय होर्डिंग कोसळले होते. परंतु दुर्घटना टळली. यामध्ये अनेक कार व दुचाकींचा चुराडा झाला होता. तसेच यापूर्वी हिंजवडीत एकाच्या घरावर होर्डिंग कोसळून घराचे छप्पर तुटले होते. घराला मजबूत लाकडी तुळया असल्याने अनर्थ टळला होता.
प्रशासनाकडे परवाना विभागच नाही
मुळशीत किमान पाचशेपेक्षा जास्त होर्डिंग असून ते विनापरवानगी उभे आहेत. महापालिकेप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडे आकाश चिन्ह परवाना विभागच नसल्याने परवानगी घ्यायची कुणाकडून हाही मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे, अशी माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर काही होर्डिंगधारकांनी दिली आहे.
प्रशासनाने प्रत्येक गावचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार आज सदर ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवकांची बैठक घेत त्यांना गावातील अनधिकृत व धोकादायक होर्डिंग पाडण्याचे आदेश दिले आहेत.उद्यापासून टेक्निकल टीम प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्व धोकादायक होर्डिंग हटविण्यासाठी काम करील. तशा सूचना संबंधित ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.
– संदीप जठारे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती.