Economy News | Investment – सार्वत्रिक निवडणुका आणि त्याच्या निकालाभोवतीची अनिश्चितता या मुख्य कारणामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी चालू महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत भारतीय शेअर बाजारातून १७ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक काढून नेली आहे. या मागे नफेखोरीचाही एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या एप्रिल महिन्यापेक्षा मे महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसे काढून घेण्याचे हे प्रमाण जास्त आहे. एप्रिल महिन्यात गुंतवणुकदारांनी ८७०० कोटी रूपये काढून नेले होते. त्या आधीच्या दोन महिन्यात म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च मध्ये विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात उत्साहाने गुंतवणूक करताना दिसत हेाते.
हे गुंतवणूकदार भारतातील निवडणूक निकाल स्पष्ट होईपर्यंत सावध भूमिका स्वीकारू शकतात, असे ट्रेडजिनीचे सीओओ त्रिवेश डी यांनी सांगितले. मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे सहयोगी संचालक – व्यवस्थापक संशोधन हिमांशू श्रीवास्तव यांनीही अशीच प्रतिक्रीया दिली आहे.
ते म्हणाले की भारतातील निवडणूक निकालाविषयी सध्या अनिश्चीतता निर्माण झाली आहे आणि याची कल्पना विदेशी गुंतवणुकदारांनाही आली आहे. भारतातील सध्याची राजकीय अनिश्चितता लक्षात घेता आणि अमेरिकेतील व्याजदर अजूनही आकर्षक आहेत, त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार तिकडे वळले आहेत असे स्मॉलकेस मॅनेजर आणि कॅपिटलमाइंडचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक कृष्णा अप्पाला यांनी सांगितले.