कर्ज फेडण्यास असमर्थ आहात? (भाग-१)

अनेकदा गरजेपोटी किंवा आपत्कालिन स्थितीत कर्ज घ्यावे लागते. मग ते गृहकर्ज असो, सोने तारण कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज असो. आपल्या क्षमतेनुसार कर्ज घेणे चुकीचे नाही, मात्र जेव्हा क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतल्यास कर्जदार अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. अंथरुण पाहून पाय पसरावे, अशी प्रसिद्ध म्हणच आहे. तरीही काही मंडळी उत्पन्नाच्या तुलनेत अधिक कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतात. काही कारणांमुळेही कर्जफेड अशक्‍य होऊन बसते. अशा स्थितीत बॅंकांना विश्‍वासात घेऊन कर्जफेडीचे नियोजन केल्यास दिवाळखोरीपासून आपला बचाव होऊ शकतो.

कर्जफेडीस असमर्थ राहिल्यास हप्त्याचा बोजा वाढत जातो. कालांतराने कर्जदार डिफॉल्टर होतात. तारण म्हणून बॅंकेकडे ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव होऊ शकतो. याशिवाय तारण सोनेदेखील विकले जावू शकते. वेळेवर हप्ते न भरल्यास क्रेडिट स्कोर देखील खराब होतो आणि भविष्यात पुन्हा कर्ज मिळण्याची शक्‍यता कमीच राहते.

कर्ज फेडण्यास असमर्थ आहात? (भाग-२)

जर कर्जदार अशा स्थितीत अडकला असाल तर त्याला बाहेर काढणे देखील काहीवेळा अडचणीचे ठरू शकते. तो कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला तर यामागे अनेक कारणे असू शकतात. त्या कारणांची खात्री बॅंक किंवा कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांना वाटायला हवी. काहीवेळा कर्जदार आजारी असू शकतो, कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नोकरी गमावलेली असते, एखाद्या दुर्घटनेमुळे तो जायबंदी झालेला असू शकतो. या कारणांमुळेच तो हप्ते भरत नसावा, असे बॅंकाना वाटू शकते. जर कर्जदाराने वाईट काळ सुरू होण्याअगोदर प्रारंभीच्या काळात नियमित हप्ते भरले असेल किंवा आगाऊ हप्ता भरला असेल तर कदाचित बॅंक कर्जदाराविषयी सहानुभूती बाळगू शकते. अशा स्थितीत बॅंक किंवा वित्तिय संस्थेशी चर्चा करायला हवी. कर्जदाराने आपली परिस्थिती बॅंकांच्या कानावर घातल्यास त्यावर काही तोडगा निघू शकतो. अशावेळी बॅंका काहीअंशी सवलत किंवा मुभा देऊ शकतात. त्याचवेळी मालमत्तेवर कर्जदाराचा हक्क कायम राहू शकतो. दुसरीकडे बॅंकांचा एनपीए देखील वाढणार नाही.

– सतीश जाधव

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.