लंडन :– ब्रिटन सरकारने दहशतवाद रोखण्यासाठी तयार केलेल्या योजनेचा आढावा घेताना इस्लामिक आणि खलिस्तानी अतिरेकी देशासाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. देशाने हा प्राथमिक धोका मानून त्याचा सामना करण्याची योजना आखावी, अशी शिफारस पुनरावलोकन अहवालात करण्यात आली आहे. याशिवाय कट्टरतावादासह इतर क्षेत्रांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
आढाव्यात काश्मीर प्रश्नावर खलिस्तानी अतिरेकी समर्थक आणि ब्रिटनमधील मुस्लिमांबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
“काउंटर-टेररिझम अर्ली इंटरव्हेंशन प्रिव्हेंशन स्ट्रॅटेजी’च्या पुनरावलोकनात असा इशारा देण्यात आला आहे की, काश्मीरवरील पाकिस्तानच्या वक्तृत्वाचा ब्रिटनमधील मुस्लिम समुदायांवर प्रभाव पडत आहे आणि भारतविरोधी भावना भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. याशिवाय, ब्रिटनमध्ये सक्रिय खलिस्तान समर्थक गटांकडून प्रसारित केल्या जाणाऱ्या भारतविरोधी वक्तव्यांविरोधातही इशारा देण्यात आला आहे.
हे अतिरेकी गट हिंसाचाराचा पुरस्कार करत असल्याचे पुरावे मिळाले असल्याचे अहवालात म्हटले आहे. ब्रिटनमधील एक पाकिस्तानी धर्मगुरू काश्मीरमध्ये हिंसाचाराचा वापर करण्याचे आवाहन करताना दिसल्याचे सांगितले जाते. यूकेमध्ये दहशतवादाच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या अशा लोकांची उदाहरणे आहेत, ज्यांनी यापूर्वी काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया केल्या होत्या आणि नंतर ते अल-कायदामध्ये सामील झाले.
#UPInvestorsSummit : उत्तरप्रदेश हे राज्य आता ‘सुशासना’साठी ओळखले जाते – पंतप्रधान मोदी
खलिस्तान समर्थक अतिरेकाच्या मुद्द्यावरील अहवालात म्हटले आहे की, यूकेमधील शीख समुदायांनीही खलिस्तान समर्थक अतिरेक्यांपासून सावध राहिले पाहिजे. युकेमध्ये सक्रिय असलेल्या अल्पसंख्येतील खलिस्तान समर्थक गटांद्वारे खोटी माहिती पसरवली जाते की सरकार शिखांचा छळ करण्यासाठी भारतातील आपल्या हस्तकांशी हातमिळवणी करत आहे. ब्रिटनच्या गृहसचिवांनी सांगितले की, अहवालात केलेल्या शिफारशींची त्वरीत अंमलबजावणी केली जाईल. अतिरेकी प्रवृत्ती रोखण्यासाठी मोठ्या सुधारणांची ब्रिटनला गरज आहे.