अमृतसर: पंजाबमधील ‘वारीस पंजाब दे’संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट धमकी दिली आहे. खलिस्तानी चळवळीच्या विरोधात जाल तर इंदिरा गांधी यांना चुकवावी लागलेली किंमत तुम्हालाही चुकवावी लागेल अशी उघड उघड धमकी दिली आहे. अमित शाह यांनी हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्यांचे समर्थन केले तर ते गृहमंत्रीपदावर कसे राहतील हेदेखील पाहून घेऊ असेदेखील त्याने यावेळी म्हटले आहे.
अमृतपालचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ त्याच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. या गोंधळावेळी सहा पोलीस गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शाह यांनी खलिस्तानी चळवळ पुढे जाऊ देणार नाही असे म्हटले होते, इंदिरा गांधींनीही असेच म्हटले होते असे अमृतपाल सिंह म्हणाला. तसे खरंच काही केले तर इंदिरा गांधींच्या प्रमाणे तुम्हालाही परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच त्याने अमित शाह यांना दिली.
Amit Shah had said that won’t let Khalistan movement rise. I had said that the same was done by Indira Gandhi&if you do the same then you’d have to face consequences. If the Home Minister says the same to those demanding ‘Hindu Rashtra’, then I’ll see if he remains HM: A. Singh pic.twitter.com/5wCTIby7Xu
— ANI (@ANI) February 23, 2023
पुढे बोलताना अमृतपाल सिंह याने, “जेव्हा लोक हिंदू राष्ट्राची मागणी करू शकतात तर आम्ही खलिस्तानची मागणी का करू शकत नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खलिस्तानला विरोध करण्याची किंमत मोजली. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, मग ते पंतप्रधान मोदी असोत, अमित शहा असोत किंवा भगवंत मान असोत.”असे म्हटले आहे.
याआधीही अमृतपाल सिंहने एका कार्यक्रमात अमित शाह यांना धमकी दिली होती आणि पंजाबचा प्रत्येक तरुण खलिस्तानबद्दल बोलत असल्याचं वक्तव्य केलं होतं. आता तो म्हणाला की, “इंदिरा गांधींनीही दबाव टाकला, त्याचा परिणाम काय झाला हे सर्वांना माहीत आहे. अमित शहा यांनीही त्यांची इच्छा पूर्ण करावी. आम्ही आमचं शासन मागत आहोत, दुसऱ्याचं नाही.”
गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच खलिस्तान समर्थकांबाबत आपली भूमिका मांडली आहे. पंजाबमधील खलिस्तान समर्थकांवर सरकार लक्ष ठेवून आहे, असे ते म्हणाले होते. अमृतपालच्या साथीदाराच्या अटकेच्या निषेधार्थ पंजाबमधील अजनाला पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या समर्थकांनी नंग्या तलवारी आणि बंदुका नाचवल्या आणि पोलीस बॅरिकेड्स तोडले. अमृतपाल सिंगचा जवळचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थक पोलीस ठाण्याबाहेर जमले होते.